मुंबई दि. 24 : प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2020 आणि 2021 अंतर्गत धाराशीव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा लाभ मिळवून देण्यासाठी शासन न्यायालयीन लढा लढत असून शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.
खरीप हंगाम 2020 मध्ये धाराशीव जिल्ह्यातील 3 लाख 98 हजार पात्र शेतकऱ्यांनी सोयाबिन पिकाचा विमा भरलेला होता. विमा कंपनी मार्फत 64 हजार शेतकऱ्यांना 87 कोटी रक्कम मंजूर करून उर्वरित शेतकऱ्यांचे पीक विम्याचे दावे तांत्रिक कारणास्तव फेटाळले होते. या विरोधात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. याबाबतचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात आयोजित बैठकीत कृषी विभागाचे अधिकारी पीक विमा कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. आमदार राणा जगजित सिंह पाटील हे दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. यावेळी शासन सर्व शक्तीनिशी न्यायालयीन लढा लढत आहे. पात्र शेतकऱ्यांना याचा निश्चित लाभ मिळेल, अशी ग्वाही कृषी मंत्री श्री.मुंडे यांनी दिली.
फळ पीक विमा योजनेबाबत शासन सकारात्मक
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत कमी लागवड असलेल्या अधिसूचित फळ पिकांसाठी 20 हेक्टर लागवड क्षेत्राचे अट शिथिल करण्याची मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी केली होती. फळ पिकांसाठी तालुका क्षेत्र निश्चित करण्याची ही त्यांची मागणी होती. याबाबत सुद्धा शासन सकारात्मक असून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही श्री. मुंडे यांनी दिली. या बैठकीत आमदार श्री. पवार दूर दृश्य संवाद प्रणाली द्वारे सहभागी झाले होते.
000000
दत्तात्रय कोकरे/विसंअ