पीक विम्यापासून वंचित शेतकऱ्यांचे फेर सर्व्हेक्षण करीत दावे निकाली काढावेत – कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश

मुंबई, दि 24 : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली आणि बुलढाणा तालुक्यातील पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचे फेर सर्वेक्षण करून पीक विम्याचे दावे निकालात काढावेत व महिनाभरात पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, असे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

चिखली व बुलढाणा तालुक्यातील पीक विम्याबाबत आमदार श्वेता महाले यांच्या मागणीच्या अनुषंगाने कृषी मंत्री श्री. मुंडे यांनी बैठक आयोजित केली होती. या बैठकीस कृषी संचालक विजयकुमार आवटे तसेच कृषी विभागातील अधिकारी आणि पिक विमा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील 89 हजार 780 शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. त्यापैकी 28 हजार 293 शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. त्यापैकी केवळ 2278 तक्रारी ग्राह्य करण्यात आल्या होत्या. त्यामुळे 26015 शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिले होते.

बुलढाणा तालुक्यातील 54804 शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. त्यापैकी 24,585 शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यातील केवळ 1611 तक्रारी ग्राह्य धरण्यात आल्या. त्यामुळे 22974 शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिल्याच्या तक्रारी होत्या.

यावेळी श्री. मुंडे म्हणाले की,  केवळ 5 टक्के शेतकऱ्यांना पात्र ठरविण्यात आल्याने 95 टक्के शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याने कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांकडून सॅटॅलाइट इमेज उपलब्ध करून कारणांसह दावे निकाली काढावीत. त्यासाठी कृषी आयुक्त आणि जिल्हा कृषी प्रशासनाने आवश्यक ती मदत करावी. महिन्याभरात दावे निकाली करून शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा रक्कम जमा करावी, असे निर्देश श्री. मुंडे यांनी दिले.

000000