मुंबई, दि. २५ :- सामाजिक, साहित्यिक, पर्यावरण आणि अध्यात्मिक क्षेत्राला जोडणारा दुवा आणि ज्येष्ठ मार्गदर्शकाला महाराष्ट्र मुकला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात की, फादर दिब्रिटो यांनी धर्मप्रांतात शांतता, बंधुभाव, एकात्मता यासाठी काम करताना पर्यावरण प्रेमाची हरित वसई चळवळ उभी केली. संत साहित्याचा गाढा अभ्यास आणि त्यातून एकोपा साधण्याचा त्यांचा प्रयत्न वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. मराठी साहित्यविषयक चळवळीत पर्यावरणप्रेमी भूमिका घेऊन केलेले लेखन हे त्यांचे आगळेपण आहे. ‘सुवार्ता’ या त्यांच्या नियतकालिकाने मराठी साहित्यात वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचे लेखन मराठी साहित्यात मोलाची भर घालणारे ठरले आहे. त्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्षपदाचा मान देखील मिळाला. त्यांच्या निधनामुळे अशा विविध क्षेत्रांना जोडणारा निखळ दुवा निखळला आहे. फादर दिब्रिटो यांना भावपूर्ण श्रद्धांजली. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अनुयायांच्या दुःखात सहभागी आहोत, असेही मुख्यमंत्री यांनी संदेशात नमूद केले आहे.