रायगड जिमाका दि. 25- जिल्ह्यात अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे कोणतीही हानी होवू नये व नागरिकांना त्रास होवू नये म्हणून जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी भरपावसात विविध ठिकाणी ऑनफिल्ड उपस्थित राहत प्रशासकीय यंत्रणेकडून तातडीने उपाययोजना केल्या.तसेच नागरिकांशी संवाद साधून त्यांना दक्षता घेण्याबाबत व मदतीबाबत आश्वस्त केले. याबरोबरच नागरिकांनो आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, प्रशासनास सहकार्य करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकारी जावळे यांनी अलिबाग, रोहा, माणगाव, महाड तालुक्यात भेट दिली. त्यांनी यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला.
जिल्ह्यात कालपासून अतिवृष्टी सुरु आहे. जिल्ह्यात पूर सदृश परिस्थिती निर्माण होवून वाहतूकीचे अनेक मार्ग काही काळ बंद झाले आहे. काही ठिकाणी रस्त्यावरील मुरूम व गिट्टी वाहून गेल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याबाबत जिल्हाधिकारी यांनी त्वरीत दखल घेवून आज पाउस सुरू असतांनाच या भागांना भेट देवून पाहणी केली.
नागरिकांनी काळजी घ्यावी, अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे. पूलावर पाणी वाहत असतांना घाईगडबडीत पूल ओलांडू नये. मानवी चुकांमुळे कोणतीही जिवीत व वित्त हानी होवू नये याबाबत सर्वांनी दक्षता घेण्याचे आवाहन केले. तसेच प्रशासकीय यंत्रणेला अलर्ट राहण्याचे व नागरिकांना त्रास होणार नाही याबाबत आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.