मुंबई, दि. १ : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला’ राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या योजनेचा लाभ देण्यासाठी तांत्रिक पडताळणी सुरू करण्यात आली आहे. या तांत्रिक पडताळणीसाठी काही पात्र महिलेच्या बँक खात्यात एक रुपया जमा होईल. जमा होणारा हा एक रुपया लाभार्थ्यांचा सन्मान निधीचा लाभ नाही तर तांत्रिक पडताळणीचा एक भाग आहे असे सांगून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.
मंत्री तटकरे म्हणाल्या की, “या योजनेद्वारे अर्ज सादर केलेल्या निवडक पात्र महिला अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यात येत आहे. त्यासाठी प्रायोगिक तत्वावर काही निवडक महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी एक रुपया जमा करण्यात येत आहे.
ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू करण्यासाठी निश्चितपणे मदत होणार आहे. हा एक तांत्रिक प्रक्रियेचा भाग असून याबद्दल कुठलाही प्रक्रियेचा गैरसमज किंवा कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नका “असेही मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.
0000
काशीबाई थोरात/विसंअ/