मुख्यमंत्री :  माझी लाडकी बहीण सन्मान यात्रा

छत्रपती संभाजीनगर दि.१(जिमाका)- ‘आनंदाचा शिधा’ आणि बसगाडीत अर्ध्या तिकीटात प्रवास या योजनांचा माताभगीनींना थेट लाभ होत आहे. दोन्ही योजना यशस्वी झाल्या आहेत. आता मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत रक्षाबंधनाला पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या खात्यात मुख्यमंत्री भावाकडून रक्कम जमा होईल. ही योजना म्हणजे नारीशक्तिचा सन्मान आहे, असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज पैठण येथे केले.

‘मुख्यमंत्रीः माझी लाडकी बहिण सन्मान यात्रा’, या  कार्यक्रमाचे आयोजन आज पैठण शहरात करण्यात आले होते. त्या बोलत होत्या. माहेश्वरी धर्मशाळेच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमास पैठण तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या संचालक वर्षा भुमरे, पुष्पा गव्हाणे, वैशाली परदेशी, ज्योती वाघमारे व प्रतिभा जगताप आदी महिला उपस्थित होत्या.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, शासनाच्या वतीने महीलांसाठी तालुकास्तरावर आरोग्य शिबीरे आयोजित करण्यात येणार आहेत. पैठण तालुक्यात “महीला अस्मिता भवन” उभारण्याचे नियोजन करावे. या भवनात महीलांसाठी क्रीडा, मनोरंजन, वाचनालय व बचत गट बैठका यासाठी सुविधा निर्माण केल्या जातील. लाडकी बहीण योजनेसाठी ग्रामपंचायतस्तरावर नोंदणी सुरु असून महिलांनी आपल्या गावात असलेल्या नोंदणी सुविधेचा लाभ घ्यावा,असे आवाहनही त्यांनी केले.  या कार्यक्रमास तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. संचालन ज्योती काकडे यांनी केले.

०००००