शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान

0
259

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हे अनोखे अभियान राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये 1 जानेवारी 2024 ते 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीत राबविण्यात आले. या अभियानास विद्यार्थी व शिक्षकांबरोबरच माजी विद्यार्थी, पालक व शिक्षकप्रेमी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या अभियानात जवळजवळ 95 टक्के शाळांमधील सुमारे 2 कोटी विद्यार्थी विविध उपक्रमात सहभागी झाले होते. त्यामुळे हे अभियान मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरले. या अभियानातील काही उपक्रमांची नोंद ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्येही झाली आहे.

या अभियानात तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर यशस्वी ठरलेल्या शाळांना रोख रकमेच्या स्वरूपात पारितोषिके देण्यात आली व या रकमेचा विनियोग शाळांच्या गरजेनुसार करण्याची मुभा देखील शाळा व्यवस्थापनास देण्यात आली आहे. त्यामुळे या शाळांना तातडीच्या गरजा भागविण्याकरीता निधी उपलब्ध झाला आहे. अर्थात या भौतिक लाभापेक्षा विद्यार्थी तसेच शिक्षकांमध्ये एक प्रकारचे नवचैतन्य निर्माण होऊन अनेक सकारात्मक बदल निदर्शनास आले, ही बाब अधिक महत्वाची आहे. विविध प्रकारचे चाकोरीबाहेरील स्पर्धात्मकवृत्ती निर्माण होऊन त्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना मिळावी व त्यांना खऱ्या अर्थाने बाह्य जगाची ओळख व्हावी हा या अभियानाचा मूळ हेतू असून तो साध्य करता आला आहे. या सर्व बाबींचा विचार करून राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा’ हे स्पर्धात्मक अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

अभियानाची व्याप्ती: या अभियानात राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांनी सहभागी होणे अपेक्षित आहे. या अभियानासाठी शाळांची विभागणी शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा अशा दोन वर्गवारीत करण्यात आली आहे. प्राथमिक स्तरापासून राज्यस्तरापर्यंत शासकीय व स्थानिक स्वराज संस्थांच्या शाळा उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनाच्या शाळांची स्पर्धा करणार नसून प्रत्येक स्तरावरील विजेता या दोन्ही वर्गवारीसाठी स्वतंत्रपणे निवडण्यात येईल. हे अभियान बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्र, वर्ग अ व वर्ग ब वर्गच्या महानगरपालिकांचे कार्यक्षेत्र तसेच उर्वरित महाराष्ट्र अशा स्तरावर राबविण्यात येईल.

अभियानाची उद्दिष्टे : विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्याबरोबरच आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, क्रीडा आदी घटकांबाबत जागृती करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना देणे, शासनाच्या ध्येय धोरणाशी सुसंगत अशा शालेय प्रशासनाच्या बळकटीकरणास चालना देणे, शालेय शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक महत्वपूर्ण असलेल्या शैक्षणिक संपादणूक या घटकाच्या वृद्धीस प्रोत्साहन देणे ही या अभियानाची प्रमुख उद्दिष्टे आहेत.

अभियानाचे स्वरूप : अभियानात सहभागी होऊन एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या शाळांना पायाभुत सुविधेसाठी 33 गुण, शासन ध्येय धोरण अंमलबजावणीसाठी 74 गुण तर शैक्षणिक संपादणुकीसाठी 43 गुण असणार आहेत. सहभागी शाळांचे बृहन्मुंबई महानगरपालिका, अ व ब वर्ग च्या महानगरपालिका, उर्वरित महाराष्ट्र कार्यक्षेत्राअंतर्गत तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावरील गठीत समित्या शाळांच्या कामगिरीच्या आधारे मुल्यांकन करतील. मुल्यांकन समित्या शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन मुल्यांकन करतील. प्रश्नावलीच्या स्वरूपात योग्य ती माहिती संबंधित शाळेकडून प्राप्त करून घेवून आवश्यकतेनुसार स्थानिक पातळीवरील महाविद्यालयीन विद्यार्थी विशेषत: डी.एड, बी.एड या महाविद्यालयांचे विद्यार्थी यांची या कामासाठी मदत घेता घेतील.

अभियानाचा कालावधी: अभियानाच्या पूर्व तयारीचा कालावधी 4 ऑगस्ट 2024 पर्यंत असून या विहीत कालावधीत अभियानाची माहिती राज्यातील सर्व शाळांमध्ये पोहोचेल याची दक्षता आयुक्त शिक्षण यांच्या मार्गदर्शनानुसार विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांनी घ्यावी. या अभियानाची सुरुवात 5 ऑगस्ट रोजी होणार असून शेवट 4 सप्टेंबर 2024 रोजी होणार आहे. मूल्यांकनाची प्रक्रिया 5 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर या कालावधीत पार पाडण्यात येणार आहेत. सर्व शाळांनी या अभियानात सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी. त्याकरीता सर्वतोपरी प्रयत्न करण्यात यावेत.

पारितोषिक बृहन्मुंबई महानगरपालिका व वर्ग ‘अ’ व वर्ग ‘ब’ च्या महानगरपालिकांच्या कार्यक्षेत्रातील शाळांना पहिले 21 लाख, दुसरे 15 लाख व तिसरे पारितोषिक 11 लाख रूपयांचे असेल. उर्वरित महाराष्ट्रात 358 तालुक्यात पहिले 3 लाख, दुसरे 2 लाख, तिसरे 1 लाख, राज्यातील 36 जिल्ह्यात पहिले 11 लाख, दुसरे 5 लाख, तिसरे 3 लाख तर 8 विभागीय स्तरावर पहिले 21 लाख, दुसरे 15 लाख, तिसरे 11 लाख रूपयांचे पारितोषिके देण्यात येणार आहे.

उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना तालुकास्तरावर पहिले 3 लाख, दुसरे 2 लाख, तिसरे 1 लाख, जिल्हास्तरीय पहिले 11 लाख, दुसरे 5 लाख, तिसरे 3 लाख, विभागस्तरीय पहिले 21 लाख, दुसरे 15 लाख, तिसरे 11 लाख तर राज्यस्तरिय शासकीय व स्थानिक स्वराज संस्थांच्या व उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना पहिले 51 लाख, दुसरे 31 लाख व तिसरे 21 लाख रूपयांचे पारितोषिक देण्यात येईल.

बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रथम क्रमांकाची शाळा, अ व ब वर्ग महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रथम क्रमांकाची शाळा तसेच उर्वरित महाराष्ट्रातील प्रत्येक विभागातील प्रथम क्रमांकाच्या शाळा या राज्यस्तरावर एकमेकांशी स्पर्धा करतील. या स्पर्धेतून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी निवडलेल्या प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी निवडलेल्या शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना अनुक्रमे 51 लाख, 31 लाख व 21 लाख रूपये इतक्या रकमेचे पारितोषिक अनुज्ञेय असेल. अशाच प्रकारचे पारितोषिक इतर व्यवस्थापनांच्या शाळांना अनुज्ञेय असेल. कोणत्याही स्तरावर जिंकलेल्या पारितोषिकाच्या रकमेचा विनियोग करण्याचा अधिकारी शाळांच्या गरजांचा प्राधान्यक्रम विचारात घेऊन संबंधित शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीस असेल.

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान पहिला टप्पा : पुणे जिल्ह्याची कामगिरी’ मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाच्या पहिल्या टप्प्यात 6 हजार 123 शाळांनी सहभाग घेतला होता . त्यापैकी राज्यस्तरीय 1, विभागीय स्तरावर 2, मनपा स्तरावर 4, जिल्हास्तरावर 6 व तालुका स्तरावर 78 अशा एकूण 91 शाळांना पारितोषिके मिळाली आहेत. पुणे जिल्ह्यात मागील अभियानात राज्यस्तरीय इतर आस्थापनांच्या शाळांमध्ये बारामती येथील शारदाबाई पवार विद्यानिकेतन शाळा, शारदानगर या शाळेला 31 लाख रुपयांचे द्वितीय पारितोषिक मिळाले आहे.

वर्ग ‘अ’ व ‘ब’ वर्गच्या महानगरपालिकांचे कार्यक्षेत्रात शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये डॉ. यशवंत गणपत शिंदे विद्यानिकेतन शाळा क्र. 19, धनकवडी या शाळेला 21 लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक, क्रीडा प्रबोधनी विद्यालय, उद्यमनगर, पिंपरी कॉलनी, पिंपरी-चिंचवड या शाळेला 15 लाख रुपयांचे द्वितीय तर इतर आस्थापनांच्या शाळांमध्ये जन प्रबोधनी नवनगर विद्यालय, निगडी या शाळेला 21 लाख रुपयांचे प्रथम तर न्य इंग्लिश स्कुल, रमणबाग, पुणे या शाळेला 11 लाख रुपयांचे तृतीय पारितोषिक मिळाले.

जिल्हास्तरावरील मुल्यांकनामध्ये वेल्हे तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पाबे या शाळेस 21 लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक, इतर आस्थापनांच्या वर्गवारीत जुन्नर तालुक्यातील गुरूवर्य आर. पी. सबनिस विद्यामंदीर नारायणगाव या शाळेला 11 लाख रूपयांचे तृतीय पारितोषिक मिळाले आहे.

पुणे जिल्ह्यातील सर्व स्तरावरील सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यमांच्या शाळांच्या मुख्याध्यापकांनी ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2’या अभियानात 4 ऑगस्ट पर्यंत सहभागी होऊन शाळांना तालुका, जिल्हा, विभाग, राज्यस्तरावरील विविध प्रकारांमध्ये भरघोस पारितोषिके मिळविण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. यासाठी शाळांनी सरल प्रणालीतील स्कूल संकेतस्थळावर ‘एचएम लॉगिन’वरुन दिलेल्या टॅबद्वारे शाळेची https://education.maharashtra.gov.in/school/users/login/4 या संकेतस्थळावर माहिती भरुन पाठवावी. सर्व शाळांनी या अभियानात सहभागी होऊन पारितोषिकांची अधिकाधिक रक्कम जिंकून शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी त्याचा उपयोग करुन घ्यावा.

सुरज मांढरे, शिक्षण आयुक्त, महाराष्ट राज्य: वेगवेगळ्या शाळांमध्ये वेगवेगळे उपक्रम सुरू असताना त्या सर्वांना एका धाग्यात बांधणारा व शिक्षण विभागांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा हा कार्यक्रम आहे. यामध्ये सर्व शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन विविध उपक्रम राबवून हेतू साध्य करण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला आहे. भौतिक गोष्टींमध्ये सुधारणा करीत असतानाच शाळेचे विद्यार्थी विषयक व गुणवत्ता विषयक कामकाजसुद्धा मोजमापाच्या परिघांमध्ये आणण्यात आले असल्याने विद्यार्थ्यांच्या विकासासाठी मोलाचे योगदान या अभियानातून दिले जात आहे. हे अभियान आता शिक्षण विभागाच्या वार्षिक कामकाजाचा नियमित भाग झालेले आहे.

0000

संकलन: जिल्हा माहिती कार्यालय, पुणे

 

****

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here