‘अमृतवृक्ष’ संकल्पना घरोघरी पोहोचवा – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार

0
12

मुंबई, दि. 2 :  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी  ‘एक पेड मॉ के नाम’ ही संकल्पना मांडली. त्याच धर्तीवर राज्यात आपण ‘अमृतवृक्ष आपल्या दारी’ ही संकल्पना मांडली आणि त्यानुसार काम सुरु केले आहे. राज्यातील वृक्षलागवड आणि जोपासनेला प्रोत्साहन देण्याची ही संकल्पना ‘अमृतवृक्ष’ ॲपच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत जावी, असे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

सह्याद्री अतिथीगृह येथे मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते ‘अमृतवृक्ष’ या ॲपचे अनावरण करण्यात आले. राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल) श्रीमती शोमिता विश्वास यांची यावेळी उपस्थिती होती. नागपूर येथून अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प नियोजन व विकास ) कल्याणकुमार यांच्यासह वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

वन मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी ॲपची निर्मिती ही अतिशय चांगली संकल्पना आहे. मात्र, ती नागरिकांना वापरण्यास सुलभ आणि विना तांत्रिक अडथळा अशी असली पाहिजे. त्यामुळे नागरिकांना त्याची उपयुक्तता पटेल. या अमृतवृक्ष ॲपच्या माध्यमातून नागरिकांनी केलेल्या वृक्ष लागवडीबाबतची माहिती मिळेलच. त्याचसोबत, त्यांना वनसंवर्धनाच्या अनुषंगाने विविध माहिती उपलब्ध करुन देण्याची सूचनाही त्यांनी केली.

श्रीमती विश्वास म्हणाल्या की, वन विभागाच्या माध्यमातून ‘अमृत वृक्ष आपल्या दारी’ ही योजना राबवली जात आहे. या योजनेंतर्गत 30 सप्टेंबरपर्यंत वन महोत्सव आयोजित करुन सवलतीच्या दरात नागरिकांना रोपांची विक्री केली जाणार आहे. याशिवाय शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापनांनाही वृक्षारोपण उपक्रमासाठी वनमहोत्सवातून मोफत रोपे देण्यात येणार आहेत.  लागवड केलेल्या वृक्षांची माहिती या ॲपमध्ये भरावी लागणार आहे. सलग तीन वर्षे वृक्षांच्या जोपासनेबाबतची माहिती संकलित केली जाणार आहे. त्यासाठी संबंधितांनी वृक्षलागवड करतानाचा फोटो या ॲपमध्ये अपलोड करावा लागणार आहे आणि ठराविक काळानंतर वृक्षाच्या वाढीसह जोपासना करतानाचा फोटो अपलोड करावा लागणार आहे. त्यासाठी संबंधितांना मंत्रीमहोदयांच्या स्वाक्षरीचे ऑनलाईन प्रमाणपत्र प्राप्त करुन घेता येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

००००

दीपक चव्हाण/विसंअ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here