छत्रपती संभाजीनगर दि.३(जिमाका)- थोर स्वातंत्र्यसेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले.
राज्याचे पणन, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते नाना पाटील यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
आपत्ती व्यवस्थापन जनजागृती वाहनास पालकमंत्र्यांच्या हस्ते हिरवी झेंडी
राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन जनजागृती वाहनांना आज पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले.
या जनजागृती मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आला. या मोहिमेत प्रत्येक तालुक्यात दोन याप्रमाणे एकूण २० रोड शो व २० पथनाट्य सादर होणार आहेत. दि.७ पर्यंत ही मोहिम सुरु राहणार आहे.
अवयव दानाबाबत जनजागृती आवश्यक– पालकमंत्री
अवयव दान हे रुग्णाला जीवनदान देऊ शकते. त्यासाठी अवयवदानाविषयी जनजागृती आवश्यक आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे आज अवयवदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. दि.३ ऑगस्ट या राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.विभागीय आयुक्त दिलीप गावडे, अधिष्ठाता डॉ. शिवाजी शुक्रे, डॉ. अरविंद गायकवाड, डॉ. शिराझ बेग तसेच सर्व डॉक्टर्स, कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.