कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेता विद्यार्थ्यांनी कौशल्य शिक्षण घ्यावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती, दि. ४: आगामी काळात उद्योगजगताला असणाऱ्या कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेता विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणाऐवजी कौशल्य शिक्षण घ्यावे, याकरीता आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा निर्माण करण्यास शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

माळेगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील डिजिटल सी. एन. सी. सिम्युलेशन लॅबच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहसंचालक रमाकांत भावसार, प्राचार्य  अवधूत जाधवर, भारत फोर्जच्या पुणे प्रमुख डॉ. लीना देशपांडे, बारामतीचे प्रमुख संजय अग्रवाल, सिम्युशॉफ्ट टेक्नॉलॉजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील चौरे आदी उपस्थित होते.

श्री.पवार म्हणाले, राज्य शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्यावतीने  कौशल्य प्रशिक्षण देण्यात येत आहे. जागतिक पातळीवर कुशल मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने आगामी काळात युवकांना परदेशात नोकरी करण्याची संधी उपलब्ध करुन देण्याकरीता प्रयत्न करण्यात येत आहे. या वर्षी रोजगार निर्मितीकरीता विविध करार करण्यात आले आहेत.

समाजातील सर्व घटकांना शिक्षण व प्रशिक्षणाचे महत्व समजून सांगण्याची आपली जबाबदारी असून या संधीपासून एकही विद्यार्थी वंचित राहू नये. प्रत्येकाला दर्जेदार प्रकारचे ज्ञान मिळाले पाहिजे, अशी राज्य शासनाची भूमिका आहे. या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून कौशल्यधिष्ठित मनुष्यबळ निर्माण करण्यात येत आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्यवस्थितरित्या प्रशिक्षण पूर्ण करावे.या कार्यशाळेत नवनवीन गोष्टी शिकत राहा,  शिकतांना होणाऱ्या चुका दुरुस्त करुन पुढे जा, प्रचंड मेहनत करा, जीवनातील आवाहने पेलण्यास तयार राहा आणि जीवनात यशस्वी व्हा, असे श्री.पवार म्हणाले.

उद्योगांनी सामाजिक कार्यात सहभाग घ्यावा

भारत फोर्जने जिल्ह्यात यापूर्वी खेड शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला मदत केली असून आता माळेगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था डिजिटल सी. एन. सी. सिम्युलेशन लॅबच्या स्वरूपात मदत केली आहे. या लॅबमुळे  अतिशय अत्याधुनिक मशीनवर काम करणारे प्रशिक्षित मनुष्यबळ उद्योग क्षेत्राला मिळणार आहे. मशीनवर काम करण्याची भीती कमी होऊन त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल. याचा विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील प्रगतीच्या वाटचालीत निश्चित लाभ होईल.

भारत फोर्ज कंपनीने देशात रोजगार निर्मिती करुन नागरिकांना रोजगार उपलब्ध करुन दिले. ही संस्था उद्योगबरोबरच सामाजिक क्षेत्रातही फार मोठ्या प्रमाणात काम करीत आहेत, याचा मराठी माणसाला अभिमान आहे. भारत फोर्जप्रमाणे इतरही उद्योगांनी सामाजिक कार्यात पुढाकार घ्यावा, असे आवाहन श्री. पवार यांनी केले.

डॉ. देशपांडे यांनी भारत फोर्जच्या कंपनीच्या कामकाजाविषयी माहिती दिली. श्री. चौरे यांनी डिजिटल सी. एन. सी. सिम्युलेशन लॅबची माहिती दिली.