मुंबई, दि.५ : महिला बचतगटांच्या उत्पादनाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून महिला बचतगटांसाठी यशस्विनी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते या प्लॅटफॉर्मचे ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले.
मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, भारताच्या रिटेल क्षेत्रात ऑनलाईन शॉपिंग महत्त्वाची भूमिका निभावत आहे. सध्या करोडो रुपयांची देवाण घेवाण ऑनलाईन शॉपिंग प्लटफॉर्मद्वारे केली जात आहे. यामध्ये महिला बचतगटांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी हा पथदर्शी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील ग्रामीण, आदिवासी, शहरी अशा हजारो बचतगटांनी तयार केलेली नाविन्यपूर्ण, दर्जेदार उत्पादने यशस्विनी ई -कॉमर्स प्लटफॉर्मवर आता उपलब्ध होणार असून महिला बचत गटांना आर्थिक उन्नतीचा नवा मार्ग उपलब्ध होणार आहे.
जाहिरातीच्या आभावी अनेकवेळा महिला बचत गटांची उत्पादने विकली जात नाहीत किंवा त्यांना योग्य बाजारभाव मिळत नाही. त्यासाठी महिला व बाल विकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी या अभिनव कल्पनेच्या माध्यमातून यशस्विनी ई- कॉमर्स प्लॅटफॉर्म विकसित केला आहे.
यामध्ये बचत गटांना खरेदी किंवा विक्री करण्याकरिता सहज आपले नाव नोंदणी करता येणार आहे. तसेच बचत गटांच्या उत्पादनाचे फोटो अपलोड करता येणार आहेत तसेच त्यांच्या किंमतीची व गुणवत्तेची जाहिरात करण्यासाठी सुद्धा यामध्ये डॅशबोर्ड व्यवस्था करण्यात आली आहे.
बचतगटांना उत्पादन पॅकींग, वाहतूक, साठवणूक करणे, योग्य हाताळणी करणे या विषयी माहिती देण्यात आली आहे. महिला बचतगटांनी उत्पादन केलेल्या वस्तूंची विक्री झाल्यानंतर त्यांच्या खात्यात ऑनलाईन रक्कम जमा होण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यशस्वीनी प्लॅटफार्म सर्व जनतेसाठी उपलब्ध असून नागरिकांनी https://yashaswini.org/launch.html या प्लॅटफॉर्मला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन महिला व बाल विकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.
0000
काशीबाई थोरात/ वि.सं.अ