होमगार्ड नोंदणीसाठी १४ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

0
42

मुंबई, दि. 5 : शासन संचलित होमगार्ड संघटनेच्या मानसेवी तत्वावर होमगार्डची भरती करण्यात येत आहे. होमगार्ड संघटनेचे सदस्यत्व तीन वर्षांकरिता दिले जात असून दिलेल्या सेवेच्या गुणवत्तेवर पुढे तीन वर्षांच्या टप्प्याने वयाच्या 58 वर्षापर्यंत पूर्ण नोंदणीकृत करता येते. सध्या होमगार्ड नोंदणीसाठी 2 ते 14 ऑगस्ट 2024 कालावधीमध्ये ऑनलाईन अर्जप्रक्रिया राबविण्यात येत आहे.

होमगार्ड नोंदणीसाठी कुठलेही शुल्क आकारण्यात येत नसून होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही. पोलीस दलाच्या मागणीनुसार, आपत्कालीन परिस्थिती, कायदा व सुव्यवस्था परिस्थितीमध्ये कर्तव्य दिली जातात. बंदोबस्त काळात कर्तव्य भत्ता प्रतिदीन 570 व उपहार भत्ता 100 रूपये दिला जातो. तसेच प्रशिक्षण काळात खिसा भत्ता 35, भोजनभत्ता 100 व साप्ताहिक कवायतीसाठी 90 रूपये कवायत भत्ता देण्यात येतो. होमगार्ड सदस्यत्व घेतलेल्या सदस्यांना विनामूल्य सैनिकी, अग्नीशमन, प्रथमोपचार  प्रशिक्षण, गौरवास्पद कामगिरी केल्यास विविध पुरस्कार व पदके, तीन वर्ष सेवा पूर्ण झालेल्या होमगार्डना राज्य पोलीस दल, वन, अग्नीशमन दलामध्ये 5 टक्के आरक्षण, स्वत: चा व्यवसाय सांभाळत देशसेवा करण्याची संधी मिळते.

होमगार्डसाठी शैक्षणिक पात्रता कमीत कमी इयत्ता 10 वी उत्तीर्ण असून वय 20 ते 50 वर्षांच्या आत असावे. शारिरीक पात्रतेसाठी उंची पुरूषांकरीता 162 से.मी, महिलांकरीता 150 से.मी आणि  छाती पुरूषांकरीता न फुगविता किमान 76 से.मी व फुगवून 81 से.मी असावी. शारिरीक क्षमतेसाठी पुरूष उमेदवारांकरीता 1600 मीटर धावणे, महिलांकरीता 800 मीटर धावणे, गोळाफेक चाचणी घेण्यात येणार आहे, असे समादेशक होमगार्ड बृहन्मुंबई यांनी प्रसिद्ध पत्रकान्वये कळविले आहे.

होमगार्डकरिता https://maharashtracdhg.gov.in/mahahg/enrollmentform.php या संकेतस्थळावर इंग्रजी भाषेत ऑनलाईन अर्ज 14 ऑगस्ट 2024 रोजी सायं 5 वाजेपर्यंत करता येणार आहे. एका उमेदवाराला आधार क्रमांकाच्या सहाय्याने एकदाच अर्ज भरता येणार आहे.  बृहन्मुंबई होमगार्ड परिमंडळाच्या अंतर्गत येत असलेल्या मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातच अर्ज दाखल करता येणार आहे. अर्जांची छाननी केल्यानंतर कागदपत्र पडताळणी व शारिरीक चाचणीकरीता तारिख घोषीत करण्यात येईल. यावेळी येताना उमेदवारांनी आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, जन्मदिनांक पुराव्याकरीता एसएससी बोर्ड प्रमाणपत्र अथवा शाळा सोडल्याचा दाखला, तांत्रिक अर्हता असल्यास तत्सम प्रमाणपत्र, खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना- हरकत प्रमाणपत्र, 3 महिन्याच्या आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र, स्वत:च्या स्वाक्षरीत केलेल्या छायांकित प्रती, दोन छायाचित्र व मूळ कागदपत्रे पडताळणीकरीता सोबत आणावी. उमेदवारांची अंतिम निवड पोलीस ठाणे निहाय रिक्त असलेल्या जागांनुसार गुणवत्तेच्या आधारे करण्यात येणार आहे.

समान गुण असल्यास वयाने ज्येष्ठ उमेदवारास व वय समान असल्यास शैक्षणिक अर्हता, तांत्रिक प्रमाणपत्रांच्या आधारे निवड निश्चित करण्यात येईल. यापूर्वी होमगार्ड संघटनेतून अकार्यक्षम, बेशिस्त ठरल्याने, न्यायालयीन प्रकरणी दोषी असल्याने सेवा समाप्त केलेले होमगार्ड अर्ज करण्यास अपात्र आहेत. मात्र स्वेच्छेने राजीनामा दिलेले उमेदवार विहीत अटी पूर्ण करीत असल्यास अर्ज करू शकतात. अंतिम गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. पथक, पोलीस ठाणे निहाय रिक्त जागा निश्चित करण्याचे सर्व अधिकार होमगार्ड समादेशक यांनी राखून ठेवले आहेत. अर्ज भरण्याबाबत काही अडचण आल्यास उमेदवारांनी बृहन्मुंबई होमगार्ड कार्यालय येथील 022-22842423 क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

ऑनलाईन अर्ज असा करावा

होमगार्ड नोंदणी https://maharashtracdhg.gov.in/mahahg/enrollmentform.php या संकेतस्थळावर HGs ENROLLMENT  या मेनूमधून ऑनलाईन एनरॉलमेंट फॉर्म हा सबमेनू निवडावा. सर्व प्रथम जिल्हा निवडावा, 12 अंकी आधार क्रमांक भरावा, यानंतर लिंग, पूर्ण पत्ता, शिक्षण, व्यवसाय, ईमेल आयडी माहिती भरावी, ज्या प्रकारची तांत्रिक अर्हता आहे, त्यांची संख्या निवडावी. जन्मदिनांक, उंची व यापूर्वी होमगार्ड सेवेची स्थिती निवडावी. अर्ज सादर केल्यावर प्रिंट काढावी. पडताळणीकरीता येताना ही प्रिंट आवश्यक कागदपत्रांसह सादर करावी.

००००

निलेश तायडे/विसंअ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here