मुंबई दि. ६: सन २०२४-२५ मध्ये योजनेंतर्गत चालू हंगामामध्ये ‘बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपा’चा पुरवठा करण्याकरिता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जाद्वारे करण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी पोर्टलवर दि. १४ ऑगस्ट, २०२४ पर्यंत अर्जकरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पद्धतीस चालना देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्यसाखळीस चालना देणे या उद्देशाने राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२२-२३ ते २०२४-२५ या तीन वर्षात राबविण्यात येत आहे.
शेतकऱ्यांनी mahadbt.maharashtra.gov.in farmer login या वेबसाईट वर जाऊन जास्तीत-जास्त ऑनलाईन अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी / उप विभागीय कृषी अधिकारी / तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
0000
अर्ज करणेबाबतची कार्यवाही
अर्ज करणे साठी वेबसाईट
“https://mahadbt.maharashtra.gov.in”
लाभार्थी (शेतकरी ) “युजर आयडी व पासवर्ड” टाकणे
“अर्ज करा” या बाबीवर क्लिक करणे
“कृषी यांत्रिकीकरण” बाबीवर क्लिक करणे
“मुख्य घटक” बाबीवर क्लिक करणे
“तपशील” बाबीवर क्लिक करून –
“मनुष्यचलित औजारे घटक निवड”
“यंत्र / औजारे व उपकरणे – पिक संरक्षण औजारे”
“बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप (कापूस किंवा सोयाबीन)” बाब निवडणे
जतन करणे