मुंबई, दि.७ :- कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि संलग्नित १०० रुग्णखाटांचे आयुर्वेद रुग्णालयास मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे.
आयुर्वेदाचा पायाभूत सिद्धांत स्वास्थस्य स्वास्थ्य रक्षणम् साध्य करण्यासाठी राज्यातील आरोग्य सेवेतील आयुर्वेद तज्ज्ञांची आवश्यकता लक्षात घेऊन कागल, जिल्हा कोल्हापूर येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व सलग्नित १०० रुग्णखाटाचे आयुर्वेद रुग्णालय स्थापन करण्याची आज मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.
केंद्र शासनाच्या व भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग नवी दिल्ली यांच्या मान्यतेच्या अधीन राहून कागल जिल्हा कोल्हापूर येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व संलग्न १०० रुग्णखाटांचे आयुर्वेद रुग्णालय स्थापन करण्यास शासनाने शासनास मान्यता देण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर महसूल विभागाच्या सहमतीने जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांच्यामार्फत निकषानुसार आवश्यक जागा उपलब्ध करून घेण्यात येऊन त्या जागेत नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली.
या महाविद्यालयासाठी विविध संवर्गातील पदे अंदाजपत्रकीय तरतूद करुन विहित मार्गाने निर्माण करण्यास व भरण्यास परवानगी देण्यात आली. तसेच या महाविद्यालयांशी संलग्नित अनुषंगिक आयुर्वेद रुग्णालयासाठी विविध संवर्गातील पदे अंदाजपत्रकीय तरतूद करुन विहित मार्गाने निर्माण करण्यास व भरण्यास परवानगी देण्यात आली आहे. या महाविद्यालय व अनुषंगिक रुग्णालयांसाठी आवश्यक तसेच अतिरिक्त बांधकाम करण्यास व खर्चास मान्यता देण्यात आली.
केंद्र शासनाच्या आरोग्य विषयक धोरणाचा भाग म्हणून आधुनिक वैद्यक शास्त्राव्यतिरिक्त भारतीय चिकित्सा पद्धती सोबत इतर चिकित्सा पद्धतीचा प्रचार प्रसार करण्याकरीता स्वतंत्र आयुष (आयुर्वेद, योगा, युनानी, सिद्ध, होमिओपॅथी) मंत्रालयाची स्थापना करण्यात आली. जनतेला आरोग्य सेवा अत्यंत प्रभावी व परिणामकारकपणे देण्यासाठीय आयुष मंत्रालय कार्य करत आहे. राज्यातील वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग देखील सदरील कार्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्याअतर्गत आयुर्वेद महाविद्यालयामार्फत दर्जेदार आयुर्वेद शिक्षण घेऊन आयुर्वेद पदवीधर समाजात येत आहेत व समाजाचे आरोग्य सुदृढ राहाण्यासाठी सेवा प्रदान करत आहेत.
00000
राजू धोत्रे/विसंअ