मावळ तालुक्यातील पूर्ण झालेल्या विकासकामांच्या उद्घाटनासह निविदा झालेल्या कामांचे भूमिपूजन सप्टेंबरच्या सुरुवातीला करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

मावळ विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचा आढावा

मुंबई, दि. ७ :- पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील विविध विकासकामांना मान्यता देऊन भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे या निधीतून सुरु असलेल्या विकासकामांना गती देऊन ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करावीत. त्याचप्रमाणे प्रस्तावित विकासकामांची निविदा प्रक्रिया पार पाडून प्रत्यक्ष कामास सुरुवात करावी. मावळ विधासनभा मतदारसंघातील पूर्ण झालेल्या विकासकामांचे उद्घाटन आणि निविदा प्रक्रिया झालेल्या कामांचे भूमीपूजन सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला घेण्याबाबतची तयारी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज संबंधित शासकीय यंत्रणांना दिले.

मावळ विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात आढावा घेतला. या बैठकीस क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, आमदार सुनील शेळके, अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, वित्त विभागाच्या सचिव शैला ए., सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सदाशिव साळुंखे, क्रीडा विभागाचे आयुक्त राजेश देशमुख आदी उपस्थित होते. पुणे विभागाचे आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे, पुणे महानगर आयुक्त योगेश म्हसे आदी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कार्ला येथील आई एकविरा देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी साधारण ४५ लाख भाविक येतात. त्यामुळे मंदिर परिसरात भाविकांना चांगल्या सोयीसुविधा देण्यासाठी मंदिराच्या जीर्णोद्धाराची कामे करण्यात येत आहेत. वेहेरगाव येथील श्री एकवीरा देवी मंदिर येथे फनिक्युलर रेल्वे उभारण्यासंदर्भातील कामांना तांत्रिक मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पामुळे श्री एकविरा देवी मंदिरात ५ मिनिटांमध्ये पोहोचता येणार आहे. या प्रकल्पाची गतीने उभारणी करताना भाविकांच्या सुरक्षिततेची देखील काळजी घ्यावी. या रेल्वे उभारणीचा प्रस्ताव पायाभूत समितीकडे सादर करण्यात आला असल्याने हा प्रकल्प लवकर सुरू होण्यासाठी पायाभूत समितीला विनंती करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेल्या श्री संत संताजी जगनाडे महाराजांच्या स्मारकाच्या कामाला गती देण्याचे निर्देशित करून उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले की, श्री संत जगनाडे समाधी मंदिरात भाविकांचा ओघ पाहता या जागेच्या विकासासह अतिरिक्त सुविधा पुरविण्यासाठी 66.11 कोटी रूपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरातील दुरूस्ती, घाट बांधकाम, पर्यटन निवास, कंपाऊंड भिंत, संग्रहालय निर्मिती आदींना प्रशासकीय मान्यता लवकरात लवकर घेण्यात यावी. निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामाचे कार्यारंभ आदेश द्यावेत. या आराखड्याच्या कामाचे भूमीपूजनही पुढील महिन्याच्या सुरुवातीला करण्यात येईल. लोणावळा व वडगाव (मावळ) येथील उपजिल्हा रूग्णालयाचे उर्वरित बांधकाम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, लोणावळा जवळील कुरवंडे येथे पर्यटनाला चालना देण्यासाठी टायगर व लायन्स पॉईंट या पर्यटनस्थळी पायाभूत सुविधा उभारण्याच्या दृष्टीने विविध विकासकामे प्रस्तावित आहेत. या संदर्भात विकास आराखडा तयार करण्यात आला असून या परिसरात ग्लास स्कायवॉक तसेच लायन्स व टायगर पॉईंट जोडणाऱ्या दरीवरील पूल, साहसी खेळांचा विकास, प्रकाश व ध्वनी शो, रस्ता रूंदीकरण अशा विविध पायाभूत सुविधांची विकास कामे प्रस्तावित आहेत. राज्यात ग्लास स्कायवॉकसारखा पहिलाच प्रकल्प होत आहे. त्यामुळे पर्यटकांसाठी आकर्षणाचे मोठे केंद्र बनू शकणाऱ्या या पर्यटन ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे. त्यासाठी आयआयटी रुरकी आणि दिल्ली येथील स्ट्रक्चरल डायनॅमिक विभागाचे मार्गदर्शन घेण्यात यावे. या प्रकल्पातील पाणीपुरवठा आणि रस्त्यांची कामे शासकीय यंत्रणेमार्फत करण्यात यावीत, तर उर्वरित पायाभूत सुविधा उभारण्याची कामे पीपीपी तत्त्वावर करण्यात यावीत, अशा सूचना त्यांनी दिल्या.

मावळ येथे तालुका क्रीडा संकुल बांधण्यासाठी मौजे जांभुळ येथे 2 हेक्टर 60 आर एवढे क्षेत्र मंजूर करण्यात आले आहे. यात 400 मीटर धावनपट्टी, फुटबॉल मैदान, क्रीडांगण, स्टेडियम बिल्डींगसह इतर कामे करण्याचे प्रस्तावित आहे. तालुकास्तरीय क्रीडांगणासाठी मंजूर निधीतून कामांना सुरुवात करण्यात यावी. तसेच ज्या कामांना अतिरिक्त निधीची आवश्यकता आहे, त्याचा प्रस्ताव पाठविण्यात यावा. त्यालाही निधी देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आशियाई विकास बँक अंतर्गत सुरु असलेल्या मावळ तालुक्यातील एकूण ४३ किमीचे रस्ते, वडगाव प्रशासकीय इमारतीचे बांधकाम, इंद्रायणी व पवना नदीवरील पुलांची कामे, कान्हे येथील रेल्वे उड्डाणपूल यांच्या कामांचा आढावा घेतला. ही सर्व विकासकामे कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

निगडी येथील लोकमान्य हॉस्पिटलमधील कामगारांना कामावर रूजू करून घेण्यासंदर्भात तसेच त्यांना मागील सर्व थकबाकी रक्कम मिळणेसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे चर्चा करण्यात आली. यासंदर्भात राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटना ही कामगार न्यायालयात गेली असल्याने यासंदर्भात न्यायालयाच्या आदेशानंतर निर्णय घेण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

पुणे जिल्ह्यातील पवना जलकुंभ धरण प्रकल्पग्रस्तांसंदर्भातील विषयाबाबत आढावा घेताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पात्र प्रकल्पग्रस्तांना योग्य न्याय देणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाच्या नावावर सातबारा असणाऱ्या, कोणतेही अतिक्रमण नसणाऱ्या जमिनींचे पहिल्या टप्प्यात पात्र शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठीची प्रक्रिया तातडीने सुरु करण्यात यावी, अशी सूचनाही त्यांनी दिली.

०००