मुंबई, दि 7 :महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेले पॉवर स्प्रे पंप शेतकऱ्यांना तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील तसेच राज्यातील पूरबाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत नुसानभरपाई देण्याच्या अनुषंगाने नुकसानाचे पंचनामे तातडीने करण्यात यावे. तसेच विविध योजनांसाठी वितरित करण्यात आलेला निधी शेतकऱ्यांच्या खात्यात ताबडतोब वर्ग करण्यात यावा, असे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज दिले.
कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात आयोजित बैठकीत कृषिमंत्री श्री.मुंडे बोलत होते. या बैठकीस कृषी विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही राधा, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना प्रकल्प संचालक परिमल सिंह, बाळासाहेब ठाकरे ग्रामीण कृषी विकास प्रकल्प संचालक हेमंत वसेकर, कृषी संचालक विनयकुमार आवटे, सर्व विभागीय कृषी सहसंचालक, सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, प्रकल्प संचालक आत्मा व इतर अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत बोलताना कृषिमंत्री श्री. मुंडे म्हणाले की, यांनी राज्यात 99 टक्के पेरण्या पूर्ण झालेल्या असल्यामुळे शासनाच्या विविध योजनांचा माध्यमातून डीबीटी पोर्टलवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना द्यावयाचे कृषी पूरक उपकरणे, निविष्ठा यांचे वितरण त्वरित करण्यात यावे. नॅनो युरिया, डीएपी, पावर स्प्रे पंप, स्टोरेज बॅग, मेटल दिहाईड आदी साहित्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात यावे, यावेळी विविध योजनांच्या अंमलबजावणीत येणाऱ्या व प्रत्यक्ष शेतकऱ्यांना भासणाऱ्या अडचणींच्या बाबत आढावा घेण्यात आला.
००००