मुंबई, दि. ८ : धाराशिव येथील कौडगाव औद्योगिक वसाहतीमध्ये तांत्रिक वस्त्र निर्मिती पार्क (टेक्निकल टेक्स्टाईल पार्क) उभारण्याच्या कारवाईस गती द्यावी. तसेच या परिसरातील डोंगराळ भागात सोलार प्रकल्प उभारण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
धाराशिव जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या प्रकल्पांचा आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा घेतला. यावेळी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी निवेदन सादर केले होते. त्याअनुषंगाने झालेल्या बैठकीस श्री. पाटील यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी तसेच धाराशिव जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे (दूरदृश्य संवाद प्रणाली द्वारे) उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या नॅशनल टेक्निकल टेक्स्टाईल मिशनअंतर्गत धाराशिवमध्ये टेक्निकल टेक्स्टाईल पार्क उभारण्यात येत आहे. या पार्कच्या पायाभूत सुविधांच्या कामांना गती द्यावी. यामुळे १० हजार रोजगार निर्मिती होणार आहे. तसेच, वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धाराशिव या संस्थेसाठी जिल्हाधिकारी यांनी उपलब्ध नऊ एकर जागा ताब्यात घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
कृष्णा – मराठवाडा सिंचन प्रकल्पांचे कालबद्ध कृती आराखडे तयार करून प्रकल्प कार्यान्वित करावे, तुळजाभवानी देवी मंदिराच्या विकासासाठीची प्रस्तावित कामे तात्काळ सुरू करावीत. तसेच धाराशिव जिल्ह्यातील निम्न तेरणा उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी विशेष दुरुस्तीच्या प्रस्तावास मंजुरी देऊन निधीची तरतूद करण्यासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली.
000
श्रद्धा मेश्राम/विसंअ