मुंबई, दि. ८ : लेंडी प्रकल्पग्रस्तांना मदत करणे ही शासनाची भूमिका आहे. त्या अनुषंगाने या प्रकल्पग्रस्तांना विशेष बाब म्हणून सानुग्रह अनुदान देण्याविषयी विचार होणे गरजेचे आहे. या बाबतचा सविस्तर प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार महेश लांडगे आणि आमदार मोनिका राजळे यांनी विविध प्रश्नांसंदर्भात दिलेल्या निवेदनाबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी या सूचना दिल्या.
बैठकीस आमदार श्री लांडगे, आमदार श्री राठोड, आमदार श्रीमती राजळे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
लेंडी प्रकल्पातील पुनर्वसित गावांमध्ये नागरी सुविधा सुस्थितीत करण्यासाठी ८ दिवसात निविदा काढावी, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, या भागातील रस्ते चांगले करावेत. स्वेच्छा पुनर्वसन करू इच्छिणाऱ्या गावांसाठी प्रस्ताव सादर करावा.
अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील ९ गावांचा समावेश ताजनापूर उपसा सिंचन योजनेमध्ये करण्यासाठी लागणाऱ्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या.
यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आमदार श्री लांडगे यांनी पिंपरी चिंचवड शहरातील प्रश्नाबाबत दिलेल्या निवेदना विषयी सूचना दिल्या. त्यामध्ये नागपूर ‘आयआयएम’ने कॅम्पस सुरु करण्यासाठी ७० एकर जागा घ्यावी. पुणे जिल्हाधिकारी यांनी आयआयएमकडून जागा मागणीचा प्रस्ताव घेऊन तो तातडीने शासनास सादर करावा. देहू आणि दिघी येथील सैन्य तळाजवळील रेड झोन मधील जमीन अधिग्रहण करण्यासाठी जमीन मालकांना लार ॲक्टनुसार कार्यवाही करून रेडी रेकनरच्या दुप्पट किंमत द्यावी. तसेच या दोन्ही सैन्य तळाजवळील रेड झोन कमी करण्यासाठी आणि प्राधिकरणातील जागा फ्री होल्ड करण्याबाबत, प्रस्ताव सादर करावा.
तसेच पिंपरी चिंचवडमध्ये पोलीस आयुक्तालय बांधण्यासाठी लवकरात लवकर निविदा प्रक्रिया पूर्ण करावी. मेट्रोचा डीपीआर तयार करण्यात येत आहे. त्याप्रमाणे डीपीआर मंजुरीसाठी पाठपुरावा करावा,अशा सूचनाही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या.
०००००
हेंमतकुमार चव्हाण/विसंअ