जर्मनीतील बाडेन वुटेमबर्ग राज्याला कुशल मनुष्यबळ पुरविण्याबाबत महाराष्ट्र राज्य आणि जर्मनीतील बाडेन वुटेमबर्ग मध्ये सामंजस्य करार
मुंबई, दि. 9 : प्रत्येक कामात अचूकता येण्यासाठी जर्मनीमध्ये एकाग्रतेने काम करण्यावर भर दिला जातो. विद्यार्थ्यांनी जर्मन नागरिकांच्या या कार्यसंस्कृतीचे अनुकरण करावे. त्याचबरोबर ज्ञान संपादनासाठी अधिकाधिक वाचनाची सवय अंगीकारावी, असे आवाहन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले.
जर्मनीतील बाडेन वुटेमबर्ग राज्याला कुशल मनुष्यबळ पुरविण्याबाबत महाराष्ट्र राज्य आणि बाडेन वुटेमबर्ग मध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. या उपक्रमाचा तसेच शालेय शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा; महावाचन उत्सव; माझी शाळा, माझी परसबाग; माझी शाळा, स्वच्छ शाळा या प्रोत्साहनात्मक उपक्रमांच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन राज्यपाल श्री.राधाकृष्णन यांच्या हस्ते राजभवन येथे झालेल्या कार्यक्रमात करण्यात आले. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव आय.ए. कुंदन, जर्मनीचे मुंबईतील महावाणिज्य दूत एचिम फेबिग यांच्यासह शालेय विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक आदी यावेळी उपस्थित होते.
जर्मनीमध्ये रोजगार मिळण्यासाठी इच्छुक उमेदवारांना नोंदणी करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या क्युआर कोडचे तसेच या प्रकल्पाच्या बोधचिन्हाचे अनावरण यावेळी राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले. शालेय शिक्षण विभाग आणि गोथ्ये इन्स्टिट्यूट यांच्यात युवकांना जर्मन भाषा शिकविण्याबाबत झालेल्या करारांचे आदानप्रदान करण्यात आले. तसेच बृहन्महाराष्ट्र मंडळ, अमेरिकेशी तेथील मुलांना मराठी शिकविण्याबाबत झालेल्या सुधारित करारांचे हस्तांतरण करण्यात आले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणाले, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिस्त आणि एकाग्रता अतिशय महत्त्वाची आहे. एकावेळी एका कामावर लक्ष केंद्रित करून त्यात अचुकता येईल यासाठी प्रयत्न करावा. जर्मनीची कार्यसंस्कृती यासाठी प्रसिद्ध असून तेथे रोजगार मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी या बाबींचा अंगिकार करावा. आयुष्यात अडचणी आल्या तरीही त्यावर मात करुन पुढे जाणारे यशस्वी ठरतात, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या लक्ष्याच्या दिशेने एक एक पाऊल पुढे जात रहावे, असा सल्ला त्यांनी दिला. शालेय शिक्षण विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक करून त्यांनी या उपक्रमांना शुभेच्छा दिल्या.
व्हिडिओ संदेशाद्वारे मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, जर्मनीला कुशपोल मनुष्यबळ पुरविणे हा लोकाभिमुख उपक्रम आहे. यातून विद्यार्थ्यांना जर्मनीमध्ये रोजगार उपलब्ध होणार आहे. माझी शाळा सुंदर शाळा उपक्रम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला चालना देणारा असून या उपक्रमाची गिनिजबुक मध्ये नोंद झाली आहे. महावाचन उत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची नाळ वाचन संस्कृतीशी जोडली जावी, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे विद्यार्थ्यांना रोजगारासाठी जर्मनीमध्ये जाण्याचे नवे दालन खुले झाल्याचे सांगितले. युवकांना याचा लाभ होणार असून राज्य शासन आवश्यक ती सर्व मदत करणार असल्याचे ते म्हणाले.
ग्रामविकास मंत्री श्री.महाजन यांनी पारंपरिक शिक्षणाबरोबरच चाकोरीबाहेरील शिक्षण देण्याच्या मंत्री श्री.केसरकर यांच्या प्रयत्नांची प्रशंसा केली. माझी परसबाग उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना शेतीचे महत्त्व कळेल तसेच त्यासंदर्भात जागरुकता निर्माण होईल. जर्मनीमध्ये रोजगार उपलब्ध करुन देणारा करार युवकांसाठी अतिशय उपयुक्त असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
मंत्री श्री.लोढा यांनी भारतात कुशल मनुष्यबळाची कमतरता नसल्याचे सांगून आपल्या कर्तृत्वावर भारतीय व्यक्ती जगभर सर्वच क्षेत्रात कार्यरत असल्याचे म्हणाले. राज्य शासनामध्ये युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शालेय शिक्षण विभागासोबत इतर संबंधित विभाग एकत्रित प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी प्रास्ताविकाद्वारे उद्घाटन होत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. युवकांना कौशल्य प्रशिक्षण घेऊन बाडेन वुटेमबर्ग येथे रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी राज्य शासन आवश्यक ते सर्व सहकार्य करणार असून त्यांनी परिश्रम करण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा; अभियानाच्या पहिल्या टप्प्याला मोठा प्रतिसाद लाभला असून यामुळे शाळा अधिक चांगल्या होत असल्याचे ते म्हणाले. रिड इंडियाच्या धर्तीवर राज्यात महावाचन उत्सवाच्या माध्यमातून वाचन ही सवय बनावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन हे ब्रँड अम्बॅसिडर असून त्यांनीही विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लावण्याचे आवाहन केल्याचे ते म्हणाले. शेती हा देशाचा आत्मा आहे. माझी परसबाग उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शेतीविषयक शिक्षण मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी वाचनाची सवय अंगिकारावी याबाबत ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचा संदेश यावेळी दाखविण्यात आला. तर विविध उपक्रमांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थिनींनी यावेळी मनोगत व्यक्त केले. शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक आर.विमला, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार आदी यावेळी उपस्थित होते.
00000
बी.सी.झंवर/विसंअ