महत्वाकांक्षी योजनांच्या प्रचाररथाला पालकमंत्र्यांच्या हस्ते हिरवी झेंडी

0
11

चंद्रपूर, दि. 12 : राज्य शासनाने शेतकरी, महिला, युवक-युवती, सर्वसामान्य नागरिक, वृद्ध नागरिक व इतरांसाठी अनेक महत्वाकांक्षी योजना सुरू केल्या आहेत. या योजनांची माहिती जनतेला माहित व्हावी, या उद्देशाने जिल्हा प्रशासन आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने विविध कल्याणकारी योजनांचा प्रचाररथ जिल्ह्यात फिरविण्यात येत आहे. या प्रचाररथाला राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.

नियोजन सभागृह येथे झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, नियोजन समितीचे सदस्य डॉ. मंगेश गुलवाडे, ब्रिजभुषण पाझारे आदी उपस्थित होते. राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजना जसे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज पुरवठा योजना, अन्नपूर्णा योजना आदी योजनांची  प्रचार प्रसिध्दी या चित्ररथाद्वारे करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : राज्य शासनाची अतिशय महत्वकांक्षी असलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 2 लक्ष 84 हजार 857 अर्ज प्राप्त झाले. यापैकी तपासणी पूर्ण झालेल्या अर्जांची संख्या 2 लक्ष 81 हजार 588 आहे. ही टक्केवारी 98.85 आहे. रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सर्व लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे प्रत्येकी 1500 रुपये याप्रमाणे 3000 रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना मोफत वीज : मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेतून चंद्रपूर जिल्ह्यातील 59,765 शेतकऱ्यांना पाच वर्षासाठी मोफत वीज मिळणार आहे. सध्या राज्यात कृषीपंपांना रात्री 8 तास किंवा दिवसा 8 तास चक्राकार पद्धतीने थ्री फेज वीज पुरवली जाते. आता शासनाने 7.5 एच.पी. पर्यंतच्या कृषीपंपांना मोफत बीज देण्याचे ठरविले आहे. या योजनेचा लाभ चंद्रपूर जिल्ह्यातील 59765 शेतकऱ्यांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजना : राज्यातील 65 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी तसेच वयोमानानुसार त्यांना येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी  आवश्यक साहित्य / उपकरणे खरेदी करणे, तसेच वृध्दांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी राज्यात ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ राबविण्यात येत आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना : 12 वी पास, विविध ट्रेडमधील आय.टी.आय., पदविधारक, पदवी आणि पदव्युत्तर युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.या योजनेंतर्गत शासनामार्फत शैक्षणिक अर्हता 12 वी पास करीता प्रतिमाह विद्यावेतन 6 हजार रुपये, आय.टी.आय/पदविका करीता प्रतिमहा 8 हजार रुपये तर पदवीधर/पदव्युत्तर करीता प्रतिमहा 10 हजार याप्रमाणे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात दरमहा विद्यावेतन जमा करण्यात येईल.

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना : महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियांमधील 60 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेट देण्याची / दर्शनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना : या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलिंडरचे पूनर्भरण मोफत उपलब्ध करू देण्यात येत आहेत. पात्र लाभार्थ्यांची गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे व त्यामुळे सर्व गॅस लाभार्थी यांनी गॅसची  ई-केवायसी करणे बंधनकारक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here