‘नवीन चंद्रपूर’मुळे जिल्ह्याच्या वैभवात भर पडेल – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

‘बालेवाडी’च्या धर्तीवर चंद्रपुरात साकारणार अद्ययावत स्टेडियम

चंद्रपूर, दि. 14 : चंद्रपूर जिल्ह्याचा झपाट्याने होत असलेला विकास आणि शहराची वाढती लोकसंख्या बघता यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी इरई नदीच्या बाजूस होत असलेले ‘नवीन चंद्रपूर’ नक्कीच जिल्ह्याच्या वैभवात भर टाकेल. म्हाडाने यासाठी पुण्याच्या बालेवाडी स्टेडियमच्या धर्तीवर अद्ययावत  क्रीडा संकुल चंद्रपुरात करण्यासाठी उचललेले सकारात्मक पाऊल उज्ज्वल भविष्याची नांदी आहे, असा विश्वास राज्याचे वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

नवीन चंद्रपूरच्या निर्मितीसाठी ‘म्हाडा’ची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणूक झाल्यानंतर सातत्याने याचा पाठपुरावा मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या माध्यमातून सुरू आहे; त्यांच्याच संकल्पनेतून विकासकांची, विविध संस्थाचालकांची, उद्योग व्यवसायातील गुंतवणूकदरांची एक दिवसीय बैठक नागपुरातील वनामती सभागृहात मंगळवारी पार पडली. यावेळी म्हाडाचे उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय जयस्वाल, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांच्यासह म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, वैविध्यपूर्णतेने संपन्न चंद्रपूर हा वाघांचा जिल्हा गेल्या काही वर्षात वन अकादमी, सैनिकी शाळा, बोटेनीकल गार्डन, कॅन्सर हॉस्पिटल, एसएनडीटी महाविद्यालय यासारख्या वैशिष्टपूर्ण संस्था आणि पायाभूत सुविधांमुळे  देशाच्याच नव्हे तर  जगाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. हा विकास होत असताना जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या चंद्रपूर शहरात वाढते नागरिकीकरण लक्षात घेता परिसरातील जंगल क्षेत्राचा विचार करता शहराच्या विकासाला मर्यादा आहेत; म्हणूनच कमी दरात घर उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने 10 हजार घरांची योजना महाप्रीत सोबत करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यापैकी 3600 घरे करण्याबाबतची बैठक नुकतीच झाली असल्याचे सांगत इतर सर्व पायाभूत सोयी सुविधा, शासकीय कार्यालये, इमारती यासाठी आग्रह करत असताना या भागात 100 एकर मध्ये पुण्याच्या बालेवाडी स्टेडीयम प्रमाणेच अद्ययावत स्टेडीयम करण्याचा माझा संकल्प होता, तो म्हाडाने जागा उपलब्ध करून पूर्ण केला याचे विशेष समाधान आहे. नवीन चंद्रपूरचा प्रकल्प या “इन्व्हेस्टर समिट” मुळे वेगाने मार्गी लागेल. म्हाडाने यासाठी नव्याने आराखडा तयार केला असून प्रत्यक्षात काम सुरू करण्याच्या दिशेने ठोस पावले टाकली असल्याने गती प्राप्त होईल, असा विश्वास पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला.

काय आहे नवीन चंद्रपूर ची संकल्पना? : साधारणत: 90 च्या दशकानंतर वाढती लोकसंख्या सामावून घेण्यासाठी चंद्रपूर शहराच्या आसपास जागाच नसल्याने व आसपासचा परिसर जंगलांनी व्यापल्याने सुविधांवर ताण पडू लागला. त्यामुळे 1998 साली नवीन चंद्रपूर वसविण्याचा निर्णय घेण्यात आला व सूत्रे म्हाडाकडे देण्यात आली. त्यासाठी 139.71  हेक्टर क्षेत्र आरक्षितही केले. शाळा, रुग्णालये, महाविद्यालये, क्रीडांगण, निवासी-अनिवासी संकुले अशा अनेक सुविधांसाठी भूखंड आरक्षित करून 7 लाख 13 कोटी निधीही मंजूर करण्यात आला होता. मात्र मात्र मधल्या काळात हा विषय प्रलंबित राहिला. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यासाठी आग्रही असल्याने त्यांचे प्रयत्न मात्र सुरूच होते. अखेर  ‘म्हाडा’ ने  आराखडासाठी सल्लागाराची नियुक्ती करून कामाला गती दिली.

नवीन चंद्रपूर प्रकल्पासाठी मंगळवारी नागपुरात झालेल्या बैठकीत  ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी गुंतवणूकदारांशी थेट संवाद साधला व चर्चा केली. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवर, चंद्रपुरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, संस्थांचे प्रतिनिधी, काही नागरिक बैठकीला उपस्थित होते. यावेळी रस्ते, वीज, पाणी यासह अन्य सुविधा कशा विकसित करायच्या, नवीन चंद्रपुरात स्थानिकांना काय हवे आहे, याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.