मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मेळावा यंत्रणांनी समन्वयाने यशस्वी करावा – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा, दि. 14 (जि.मा.का.) :  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत सातारा जिल्ह्याने अत्यंत उल्लेखनीय काम केले आहे. या योजनेचा मेळावा रविवार दि. 18 ऑगस्ट रोजी सैनिक स्कूलच्या मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. या मेळाव्यास सुमारे 50 हजार महिला येणार असून यंत्रणांनी समन्वयाने काम करुन मेळावा यशस्वी करावा, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील रविवारी होणाऱ्या मेळाव्याविषयी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्ष समीर शेख, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण  यांच्यासह प्रांताधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत पालकमंत्री श्री. देसाई यांनी जिल्ह्याच्या विविध भागातून सुमारे 50 हजार महिला या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार असून त्या दृष्टीने वाहन व्यवस्था, वाहतूक, ट्राफिक, वाहनतळ, व्यासपिठ नियोजन, पाणी व स्वच्छतेची व आसन व्यवस्था आदी सर्व व्यवस्थांबाबत करण्यात आलेल्या नियोजनांचा सखोल आढावा घेतला.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 5 लाख 21 हजार 83 एवढे अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 5 लाख 13 हजार 418 इतक्या अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे.  मेळाव्यात प्रातिनिधीक स्वरुपात लाडक्या बहिणी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना राखीही बांधणार आहेत, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी बैठकीत सांगितले.

महाबळेश्वर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा दिमाखदार पूर्णाकृती पुतळा त्वरित बसवावा – पालकमंत्री शंभूराज देसाई

महाबळेश्वर बाजार पेठेच्या चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार  छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा तात्काळ बसविण्यात यावा, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

महाबळेश्वर येथील आराम चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याच्या अनुषंगाने पुतळा समितीसोबत पालकमंत्री यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.

या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्ष समीर शेख, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.

महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटनस्थळ आहे. या ठिकाणी लाखो पर्यटक वर्षभर येत असतात. अशा पर्यटनस्थळी छत्रपती शिवाजी महाराजांचा अत्यंत देखणा व दिमाखदार पुतळा असणे आवश्यक आहे.  येथील आराम चौकात पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा होता. त्या ठिकाणी जागा निश्चित करुन पूर्णाकृती पुतळा बसविण्यासाठी महाबळेश्वर नगरपालिकेने तत्काळ बैठक घ्यावी. दोन दिवसाच्या आत चौक सुशोभीकरण व पुतळा तयार करण्यासाठी वास्तुशिल्पकारांकडून डिझाईन तयार करावे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार त्वरित पूर्णाकृती पुतळा बसवावा, असे निर्देश देऊन पालकमंत्री श्री. देसाई यांनी पुढील आठ दिवसाच्या आत महाबळेश्वर नगरपालिकेच्या नवीन इमारतीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही मुख्याधिकारी यांना दिल्या.