जिल्ह्याच्या चौफेर विकासासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

0
13

भारतीय स्वातंत्र्याचा ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात आत्तापर्यंत  लाख ६० जार प्राप्त अर्जापैकी  लाख ४५ हजाराहून अधिक अर्जांना मान्यता

९० हजारपेक्षा अधिक कामगारांना विविध योजनांचा जवळपास २२० कोटींचा लाभ

        सांगली, दि. 15, (जि. मा. का.) : विकास प्रक्रियेत मागे राहिलेल्या वंचित, मागास बांधवांना सगळ्यांबरोबर संधी मिळावी, तसेच जिल्ह्याचा सर्वंकष विकास व्हावा, यासाठी शासन वचनबद्ध आहे. यासाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी जिल्हा नियोजन समितीच्या आराखड्यातून विकास कामांसाठी 573 कोटींची तरतूद केली असून, या माध्यमातून जिल्ह्याच्या चौफेर विकासासाठी प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे दिली.

        भारतीय स्वातंत्र्याच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, पद्मश्री डॉ. विजयकुमार शहा, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख-पाटील, अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्यासह विविध कार्यालय प्रमुख, स्वातंत्र्य सैनिक, वीरमाता, वीरपत्नी, नागरिक उपस्थित होते.

पालकमंत्री पुढे म्हणाले, धरणातील पाणी विसर्गाचे योग्य नियोजन केल्यामुळे आपल्याला महापूर टाळता आला. पूरपरिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज होत्या. त्यांच्यामुळेच महापूर टाळता आला. पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे आदेश देण्यात आले असून महिलांना आर्थिकरित्या सबळ करण्याच्या हेतूने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक पात्र महिलेला प्रतिमाह दिड हजार रूपये शासनाकडून देण्यात येणार आहेत. पहिल्या टप्यात आत्तापर्यंत जवळपास 4 लाख 60 हजार अर्ज प्राप्त झाले असून जिल्ह्यात यापैकी 4 लाख 45 हजाराहून अधिक अर्जांना मान्यता दिली आहे. या योजनेचे पैसे बुधवार पासून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर जमा होण्यास सुरूवात झाली आहे. यावेळी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आरोग्य, शिक्षण, उर्जा, सामाजिक न्याय, कामगार विभाग, कौशल्य विकास, अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या योजनांचा आढावा घेतला. तसेच कामगार विभागाकडून, जिल्ह्यातील कामगारांना  शैक्षणिक, आरोग्य, आर्थिक व सामाजिक लाभाचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये 90 हजारपेक्षा अधिक कामगारांना विविध योजने अंतर्गत जवळपास 220 कोटीहून अधिक रूपयांचा लाभ देण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

ध्वजारोहण समारंभानंतर पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते सैन्य सेवेत जम्मू काश्मिर येथे सीमा नियंत्रण रेषेवर कार्यरत असताना दिव्यांगत्व आलेल्या तासगाव तालुक्यातील बेंद्री येथील हवालदार प्रशांत वसंत पाटील यांना त्यांच्या शौर्याच्या सन्मानार्थ ताम्रपट व 20 लाख रूपये सानुग्रह अनुदान देऊन सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर आप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूल सांगली शाळेतील 9 वर्षाच्या इयत्ता 5 वी मधील मुलगी कु. वल्लभी शेंडगे हिने गार्डनमधील अनोख्या झोपाळ्याचे केलेल्या संशोधनासाठी भारत सरकारचे पेटंट मिळाले आहे याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला. पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2024 मध्ये राज्य गुणवत्ता यादीतील 16 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच पोलीस प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी बजाविलेल्या अनुक्रमे मिरज उप विभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, विटा उप विभागीय पोलीस अधिकारी विपूल पाटील, पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, पोलीस हवालदार सागर लवटे, पोलीस नाईक संदीप नलावडे, पोलीस फौजदार महेश जाधव व शरद माने, सहायक पोलीस फौजदार राजेंद्र पाटील, चालक पोलीस हवालदार अनिल सुर्यवशी व संजय माने यांच्यासमवेत महसुल ‍दिनानिमित्त महसूल विभागातील, विभागीयस्तरीय पुरस्कारासाठी निवड झालेल्या सहायक जिल्हा नियोजन अधिकारी पूजा पाटील, लघु टंकलेखक वहिदा तांबोळी-मणेर, अव्वल कारकून विनायक यादव यांचा सत्कारही पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आला. तद्नंतर डॉ. खाडे यांनी उपस्थितांची प्रत्यक्ष भेट घेऊन स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमास विविध मान्यवर, शासकीय अधिकारी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, पत्रकार आदि उपस्थित होते.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here