स्वातंत्र्यदिनानिमित्त पालकमंत्र्यांच्याहस्ते ध्वजारोहण
सर्वसामान्यांसाठी अनेक नवीन कल्याणकारी योजना; महिला, वृध्द, कामगारांना दिलासा देण्याचा प्रयत्न
यवतमाळ, दि.15 (जिमाका) : राज्य शासनाने नुकतीच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरु केली. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासोबतच त्यांची समाजात, कुटुंबात भागिदारी वाढविण्यासाठी ही योजना अत्यंत महत्वपूर्ण आणि क्रांतीकारी ठरणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 4 लाख 68 हजार अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 4 लाख 60 हजार अर्ज लाभ वितरणासाठी शासनास पाठविण्यात आले आहे, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
भारतीय स्वातंत्र्याच्या 77 व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, उपवनसंरक्षक धनंजय वायभासे, अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत यांच्यासह विभाग प्रमुख अधिकारी, स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचे कुटुंबिय, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांना आपल्या प्राणाला मुकावे लागले, अशा सर्व शुरविरांना पालकमंत्र्यांनी अभिवादन केले. स्वातंत्र्यानंतर देशाची जशी प्रगती होत गेली तसा महाराष्ट्र देखील झपाट्याने विकासाच्या बाबतीत अग्रेसर होत गेला. समाजातील सर्वच घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासन सातत्याने नवनवीन योजना राबवित असल्याचे पालकमंत्री म्हणाले. युवकांना रोजगारक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु करण्यात आली. प्रशिक्षणाची मागणी असलेल्या प्रत्येक युवकास या योजनेतून प्रशिक्षण दिले जातील. मासिक 6 ते 10 हजारापर्यंत विद्यावेतन सुद्धा शासन देणार आहे.
गृहिनींचा आर्थिक भार कमी करण्यासाठी वर्षातून 3 सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला. ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरु करण्यात आली. 60 वर्षावरील प्रत्येक व्यक्ती मोफत तीर्थ स्थळांना भेटी देऊन शकतील. जेष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री नावाची आणखी एक योजना शासनाने सुरु केली. 65 वर्षावरील नागरिकांना वयोमानपरत्वे येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी 3 हजाराचे अर्थसहाय्य या योजनेतून दिले जाणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले.
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरु करण्यात आली. 7.5 एचपी पर्यंत शेतीपंपाचा मंजूर भार असलेले सर्व कृषी पंपधारक शेतकरी योजनेच्या लाभासाठी पात्र आहे. शेतकऱ्यांना उद्योजक बनविण्यासाठी केंद्र शासन ‘प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना’ राबविते. या योजनेंतर्गत जिल्ह्यात 544 प्रकल्पांना मंजूरी देण्यात आली आहे. यापैकी 127 प्रकल्पांना अनुदान देखील वितरीत करण्यात आले.
तुती, फळबाग आणि बांबू लागवडीस रोजगार हमी योजनेतून आपण प्रोत्साहन देतो आहे. यावर्षी 2 हजार एकरवर तुती लागवडीचा कार्यक्रम आपण हाती घेतला. 34 हजार हेक्टरवर बांबू तर 4 हजार 725 हेक्टरवर फळबाग लागवड केली जात आहे. प्रधानमंत्री पिकविमा योजनेत यावर्षी देखील 3 लाख 47 हजार शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घेतला. या शेतकऱ्यांचे 6 लाख 66 हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे. जिल्ह्यात 1 लाख 46 हजार शेतकऱ्यांना 1 हजार 557 कोटी रुपयांचे पिककर्ज वाटप करण्यात आले आहे.
गेल्यावर्षी कापुस व सोयाबीन पिकाच्या किंमतीत घसरण झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच प्रति हेक्टर 5 हजार याप्रमाणे दोन हेक्टरपर्यंत आर्थिक मदत देण्यात येणार आहे. जिल्ह्यात एप्रिल 2023 पासून आतापर्यंत 3 लाख 73 हजार शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांना 263 कोटी रुपयांच्या मदतीचे वाटप करण्यात आले आहे. काही दिवसांपुर्वी झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले जात असून नुकसानग्रस्तांना लवकरच वाढीव दराने मदत वाटप केली जाणार आहे.
इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग व विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गासाठी राज्य शासनाने स्वतंत्रपणे मोदी आवास घरकुल योजना सुरु केली. या योजनेतून 29 हजार 999 घरे बांधली जात आहे. खनिज विकास निधीतून 21 हजार शेतकऱ्यांना सोलर फेन्सिंग साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. या निधीतूनच 63 शाळा आपण मॅाडेल स्कूल तर 15 प्राथमिक आरोग्य केंद्र, 4 उपजिल्हा रुग्णालये व 1 ग्रामीण रुग्णालय मॅाडेल रुग्णालय बनवतो आहे. वैद्यकीय महाविद्यालयात अद्ययावत सोई सुविधा असलेले 4 मॅाड्युलर ऑपरेशन थिएटर सुरु करण्यात आले. महाविद्यालयाची प्रशासकीय ईमारत पुर्णत्वास आली. सुपर स्पेशालिटी हॅास्पिटलची 288 बेड असलेली फेज 3 बिल्डींग पुर्ण झाली असून रुग्णसेवेत दाखल झाली आहे.
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतून 5 लाखापर्यंतचे उपचार विनामुल्य केले जातात. जिल्ह्यात 6 लाख 81 हजार लाभार्थ्यांनी योजनेचे गोल्डन कार्ड काढले आहे. बांधकाम मंडळाच्यावतीने विविध योजनेंतर्गत यावर्षी 11 हजार 794 कामगारांना 12 कोटी 85 लक्ष रुपयांच्या लाभाचे वितरण करण्यात आले. 15 हजार 550 कामगारांना सुरक्षा व अत्यावश्यक संच तर 32 हजार 442 कामगारांना गृहउपयोगी वस्तु संचाचे वितरण करण्यात आले, असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत 1 हजार 800 मुलांना विनामुल्य प्रवेश देतो आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून गेल्यावर्षी जिल्ह्यात 628 उद्योजकांचे प्रस्ताव मंजूर केले. यावर्षी 800 युवकांना उद्योजक बनविण्याचे उद्दिष्ट आपण ठेवले आहे. आदिम जमातीच्या विकासासाठी ‘प्रधानमंत्री जनमन योजना’ केंद्र शासनाने सुरु केली. जिल्ह्यात कोलाम या आदिम जमातीच्या नागरिकांना या अंतर्गत विविध विकास योजनांचा लाभ दिला जात आहे, असे पालकमंत्री म्हणाले.
सुरुवातीस पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते ध्वजारोहन झाले. त्यानंतर राष्ट्रगित व महाराष्ट्र गीताचे गायन करण्यात आले. पोलिस दलाच्यावतीने मानवंदना देण्यात आली. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत उपस्थित सर्वांना तंबाखूमुक्तीची शपथ देण्यात आली.
000