स्वातंत्र्यदिनानिमित्त अलिबाग येथे कु.तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण
रायगड (जिमाका) दि.15:- शेतकरी, कष्टकरी, आदिवासी, महिला, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक अशा समाजातील सर्व घटकांसाठी राज्य सरकार अव्याहतपणे कार्य करीत आहे. हेच कार्य जोमाने पुढे घेऊन जाऊ आणि जनतेच्या जीवनात दृश्य परिवर्तन घडवू, अशी ग्वाही महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी दिली.
भारतीय स्वातंत्र्याच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्ताने महिला व बालविकास मंत्री कु.आदिती वरदा सुनिल तटकरे यांच्या हस्ते अलिबाग येथील पोलीस परेड मैदानात ध्वजारोहण झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
याप्रसंगी जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, अपर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे, उप वनसंरक्षक राहुल पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास देवमाने, कार्यकारी अभियंता, सां.बा.अलिबाग जगदीश सुखदेवे, नियोजन अधिकारी जयसिंग मेहेत्रे, जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनावणे, जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती मनिषा पिंगळे यांच्यासह जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
कु.आदिती तटकरे यांनी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच देशासाठी आपले प्राण अर्पण केलेल्या ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीर, शहीद यांना वंदन केले.
महिला व बालविकास मंत्री कु.तटकरे म्हणाल्या की, राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत सर्वसामान्य माणसांच्या हितासाठी काम करता आलं याचं समाधानही आज माझ्या मनात आहे. राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात परिवर्तन घडविणे, आवश्यक त्या सर्व सेवा, सुविधा उपलब्ध करून देणे यासाठी राज्यशासन सातत्याने प्रयत्नशील आहे.
आज राज्यातील शेतकरी-कष्टकरी यांचा आर्थिक आधार बळकट करणे, आपत्तीच्या काळात या घटकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे या बाबींना महत्व दिले जात आहे. विविध योजनांची प्रभावी पद्धतीने अंमलबजावणी करुन मदतीचा हात वेळेत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यावर आमचा भर आहे. राज्याच्या यंदाच्या अर्थसंकल्पातूनही बाब ठळकपणे अधोरेखीत झाली आहे.
ग्रामीण व शहरी भागातील सुशिक्ष्िात बेरोजगारांना स्वत:चा उद्योग व्यवसाय सुरु करण्याकरिता मुख्यमंत्री रोजगार कार्यक्रमही महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी योजनाआहे.
रायगड जिल्ह्यात 400 पेक्षा जास्त नवउद्योजकांना राज्य शासनाचे रु. 7.5 कोटी पेक्षा जास्त अनुदान वाटप करण्यात आले आहे. जिल्हा उद्योग केंद्राद्वारे रायगड जिल्ह्यातील लघु उद्योजकांच्या सर्वांगीण विकासाकरिता गणपतीमूर्ती क्लस्टर, हमरापुर पेण, इंजिनिअरींग क्लस्टर, तळोजा, पनवेल व बांबू कारागिरांकरिता बांबू क्लस्टर, मुरुड हे समुह औद्योगिक प्रकल्प (क्लस्टर) प्रस्तावित आहेत. महायुती सरकारनं महिला, मुली यांच्यासाठी ज्या योजना राबविल्या आहेत.
कु.तटकरे पुढे म्हणाल्या मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनाही राज्य शासनाची क्रांतिकारी योजना आहे. महिलांचे आरोग्य, पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात आली आहे. राज्यात या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मिशनमोडवर काम सुरु आहे. आज राज्यात 1 कोटी 35 लाख महिला भगिनी या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील 3 लाख 38 हजार महिला यासाठी पात्र ठरल्या आहेत.
ज्या बहिणींची अर्ज भरण्याची प्रक्रीया पूर्ण झालेली नाही त्यांना 31 ऑगस्टपर्यंत मुदत आहे. त्यांनी अर्जाची पूर्तता केल्यानंतर पुढच्या महिन्यात त्यांना तीन महिन्यांचे एकत्र पैसे मिळतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सर्व समाज घटकांना सोबत घेऊन सर्व समावेशक विकास करण्यास शासन कटिबद्ध आहे. गेल्या वर्षभरात जनतेच्या हिताचे व जिव्हाळ्याचे निर्णय तात्काळ घेण्यास प्राधान्य दिले आहे. मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना आणि ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना अर्थसंकल्पात समाविष्ट आणि महत्वाकांक्षी म्हणून जाहीर केलेल्या सात योजनांची जिल्हा प्रशासनामार्फत अंमलबजावणी सुरु असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
महिला व बालविकास मंत्री कु.तटकरे म्हणाल्या, जिल्ह्याच्या विकासासाठी घेतलेले निर्णय जसे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा शासकीय रुग्णालयाचे बळकटीकरण, दिवेआगार येथील विस्तारीत सुपारी संशोधन केंद्र, रातवड येथील मेगाक्लस्टर प्रकल्प, जिल्हा परिषद नवीन इमारत यांची पूर्तता करण्यावर भर आहे. आपल्या जिल्ह्यात महाराष्ट्र राज्यातील पहिले युनानी मेडिकल कॉलेज म्हसळा तालुक्यातील सावर या ठिकाणी पुढील शैक्षणिक वर्षांपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याठिकाणी 100 बेड्स व 100 विद्यार्थी क्षमता असणार आहे.
रायगड जिल्हा हे नवे इंडस्ट्रियल हब म्हणून विकसित होत आहे. रायगड जिल्ह्याचा सर्वांगीण विकासासाठी आवश्यक तो सर्व निधी राज्य शासनाकडून मिळविण्यासाठी आम्ही सर्वजण विशेष प्रयत्नशील आहोत.
अटल सेतू, नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ, विरार-अलिबाग क़ॉरिडार, नवी मुंबई मेट्रोचं विस्तारणारं जाळं हे रायगड जिल्ह्याचा कायापालट करून टाकणारे गेमचेंजर प्रकल्प ठरतील असा विश्वास आहे.
जिल्ह्याच्या विकासाचं हे पर्व असंच सुरु राहावं यासाठी निरंतर प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्य शासन सर्व समाज घटकांना सोबत घेऊन सर्व समावेशक, प्रगतीशील, पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी कटिबद्ध आहे. नवीन, समृद्ध व बलशाली असा महाराष्ट्र घडविण्यासाठी एकत्र येण्याचे सर्व नागरिकांना या निमित्ताने आवाहन मंत्री कु तटकरे यांनी यावेळी केले.
यावेळी मंत्री कु.तटकरे यांच्याहस्ते दामिनी (महिला सुरक्षा बीट) पथकास 20 दुचाकी वाहने तसेच संविधान प्रत वाटप करण्यात आले.
तसेच मंत्री कु.तटकरे यांच्याहस्ते जिल्ह्यातील विविध व्यक्ती अधिकारी यांना पुरस्कार वितरण करण्यात आले.
महाराष्ट्रातील युद्धजन्य परिस्थतीत धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या बलिदानाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी युद्ध विधवा यांना ताम्रपटाचे वितरण श्रीम.निशा सुयोग कांबळे.
नारंगी, ता.अलिबाग येथील सुपूत्र लांस हवालदार सुयोग अशोक कांबळे हे दि.29 एप्रिल 2005 पासून भारतीय सैन्यामध्ये अविरत सेवा बजावित असताना देशांतर्गत सुरक्षा संबंधी ऑपरेशन स्नो लिओपार्ड मोहिमेत पूर्व सिक्कीम येथे कार्यरत असताना दि. 04 ऑक्टोबर 2023 रोजी अचानक आलेल्या महापुरात ते वाहून गेल्याने शहिद झाले आहेत.
राष्ट्रपती पोलीस पदक 2024- श्री. शिवाजी ज्ञानदेव फडतरे, उविपोअ, पेण, श्री.विनीतकुमार जयवंत चौधरी, उविपोअ, अलिबाग, श्री.शिवाजी गोविंद जुंदरे, पोउनि, खालापूर पोलीस ठाणे.
विशेष सेवा पदक-श्री. अभिजित अरविंद भुजबळ, सहा.पोलीस निरीक्षक, खालापूर पोलीस ठाणे (सन 2020 ते 2024 मध्ये आंतरराज्यीय न्यु बेस कॅम्प मुरकुटडोह, गोंदीया या जिल्यामध्ये नक्षलग्रस्त विभागात 4 वर्षे समानधानकारक सेवा पूर्ण केली.). राष्ट्रपती सुधार सेवा पदक व स्क्रॉल (प्रशस्तीपत्रक) प्रदान करणे श्री.अशोक दगडू चव्हाण, सुभेदार, तळोजा मध्यवर्ती कारागृह.
महसूल अधिकारी यांना विशेष कामगिरीबद्दल पुरस्कार- श्रीम. स्नेहा उबाळे, उपजिल्हा निवडणुक अधिकारी, (लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 चे कामकाज उत्तमरित्या पार पाडले). श्री.विकास गारुडकर, तहसिलदार माणगाव, (शासन आपल्या दारी हा कार्यक्रम माणगाव येथे राबविला, 861 आदिवासी बांधवाना सातबारा नावावर करुन जमीनी मिळवून दिल्या, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये जिल्हास्तरीय मास्टर ट्रेनर म्हणून काम केले, निवासस्थाने येथे 1 हजार झाडे लावून त्यांचे संगोपन केले.
नगरपरिषद आस्थापनेवरील अनुकंपा तत्वावरील नियुक्ती आदेशाचे वितरण-श्री. शैलेश अशोक शेळके, रा.खोपोली, ता.खालापूर (श्रीवर्धन नगरपरिषदेवरील आस्थपनेवरील गट क संवर्गात नियुक्ती देण्यात आली आहे.)
उत्कृष्ठ लघु उद्योजकांना जिल्हा पुरस्कार 2023- प्रथम पुरस्कार विजेते – मे.सहारा रुफींग टेक्नो सोल्युशन, खोपोली ता. खालापूर (रोख रु. 15000/-, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ), द्वितीय पुरस्कार विजेते मे. उपासना फॅशन, अलिबाग (रोख रु.10000/-, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ)
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2024 ग्रामीण विभाग- कु.हंस उमेश दोशी, एन.एम.जोशी विद्याभवन गोरेगाव, कु. वरुण अरुण फडतरे, सेंट झेविअर्स सेंकडरी इंग्लिश हायस्कूल महाड.
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2024 शहरी विभाग- कु.आवंतिका सुनिल टकले, एम.इ.एस.आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, नवीन पनवेल.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2024 ग्रामीण विभाग- कु.आयुष दत्तात्रेय शिंदे. डी. के.इ.टी. सी.के.व्ही.हायस्कूल इंग्लिश मिडीयम, चेंढरे.
श्री.दत्तात्रेय कमलाकर कांबळे, अध्यक्ष, वक्रतुंड मित्रमंडळ, पेण, (रायगड जिल्हयातील कोरोना काळात व आपात्कालीन परिस्थतीमध्ये खारीचा वाटा उचलून समाजिक बांधिलकीतून सेवा केली आहे. तसेच सामाजिक बांधिलक जपून प्रशासनास वेळोवेळी मदत केली आहे.)
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन रायगड- नागरी संरक्षण दल उरण/आपदा मित्र, सहयाद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था, रोहा, आपदग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, खोपोली, आपदा मित्र महाड, म्हसळा, अलिबाग
00