भारतीय स्वातंत्र्याचा 78 व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यानिमित्ताने जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

0
13

प्रशासन लोकसेवेसाठी कटिबध्द-जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

 ठाणे, दि.15(जिमाका) :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित दादा पवार, पालकमंत्री शंभूराज देसाई व जिल्हयातील इतर सर्व लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा प्रशासन विविध योजनांच्या माध्यमातून अतिशय चांगले कार्य करीत आहे. यापुढेही जिल्हा प्रशासनाकडून गरजू नागरिकांना जास्तीत जास्त योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न सुरुच राहतील. संपूर्ण ठाणे जिल्हा प्रशासन लोकसेवेसाठी कटिबध्द आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आज येथे केले.

भारत देशाच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण  ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी श्री.अशोक शिनगारे यांच्या हस्ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आवार येथे मोठया उत्साहात संपन्न झाला, त्यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.

यावेळी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.रोहन घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.डी.स्वामी, सहपोलीस आयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) गोपीनाथ ठोंबरे, उपजिल्हाधिकारी दीपक चव्हाण, जिल्हा पुरवठा अधिकारी विकास गजरे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने, अर्चना कदम, उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के-पाटील, जिल्हा भूमी अभिलेख अधिकारी बाबासाहेब रेडेकर, ठाणे प्रांताधिकारी उर्मिला पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, उमेदच्या प्रकल्प संचालक श्रीमती छायादेवी शिसोदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनिल पाटील, संजय पुजारी, ठाणे महानगरपालिका उपायुक्त मधुकर बोडके, जिल्हा परिषद उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, प्रमोद काळे, जिल्हा हिवताप नियंत्रण अधिकारी डॉ.संतोषी शिंदे, तहसिलदार रेवण लेंभे, उमेश पाटील, राहुल सारंग, राहुल सूर्यवंशी, डॉ.संदीप थोरात, आसावरी संसारे, प्रशासनातील इतर अधिकारी-कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. ग्रामीण पोलीस दलाच्या पथकाने यावेळी राष्ट्रीय ध्वजास मानवंदना दिली. तसेच यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीताची धून वाजविण्यात आली.

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आपल्या मनोगताच्या सुरुवातीस देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या सर्व हुतात्मांचे स्मरण करून त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले आणि भारतमातेच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या या सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या तसेच या सोहळ्याचा आनंद सोशल मिडीयाच्या माध्यमातून घेत असलेल्या सर्व नागरिक बंधू-भगिनींना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

ते पुढे म्हणाले, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आपल्या भारत देशाची जागतिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. सन 2047 पर्यंत भारताला आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्यासाठी सर्वानी एकजुटीने योगदान देण्याचे प्रधानमंत्री महोदयांनी आवाहन केले आहे. विकसित भारताचे स्वप्न साकारण्यात व देशाला जागतिक महासत्ता बनविण्यात महाराष्ट्राचेही योगदान असावे, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे सुपुत्र एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन अहोरात्र काम करीत आहे.

राज्य शासनाने गरीब, वंचित, शेतकरी, युवा, महिला, बेरोजगार अशा सर्वच घटकांसाठी लोकोपयोगी विविध निर्णय घेतले आहेत. महाराष्ट्र नव्याने घडविण्यासाठी शासनाने अनेक उपक्रमांना चालना दिली आहे. हे शासन लोकाभिमुख शासन असून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ मिळावा, या दृष्टीने सदैव प्रयत्नशील आहे. शासनाने नेहमीच सर्वसामान्य माणसाच्या विकासासाठी व हितासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत आणि हे काम अजूनही निरंतर व गतिमान पध्दतीने सुरु आहे.

शासन सर्वसामान्यांसाठी तसेच गरजू घटकांसाठी विविध महत्वाकांक्षी योजना राबवित आहे, “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना” या योजनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणांतर्गत गरजू महिला भगिनींना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यात येत आहे, असे सांगून त्यांनी मुख्यमंत्री- अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री- युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री- तीर्थ दर्शन योजना, मुख्यमंत्री- वयोश्री योजना, मुख्यमंत्री-बळीराजा वीज सवलत योजना, मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण योजना,  या योजनांचीही  माहिती देवून जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

ते म्हणाले, शासन व प्रशासन मिळून ठाणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासावरही भर देत आहे. जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, रस्त्यांचा विकास, शेती क्षेत्र अशा विविध पातळ्यांवर कामे वेगाने सुरु आहेत. मुंबईच्या शेजारी असलेला ठाणे जिल्हा हा महत्त्वाचा जिल्हा आहे. ठाणे जिल्ह्याचे नागरीकरण झपाट्याने होत असून त्याबरोबरच मुरबाड, शहापूर सारखा आदिवासी भागाचा विकासाकडेही लक्ष देणे आवश्यक ठरते. त्यादृष्टीनेही विकासाचे नियोजन करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून ठाणे महापालिकेतर्फे आशिया खंडातील सर्वात मोठी समूह पुनर्विकास म्हणजेच क्लस्टर योजना राबविण्यात येत आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात अस्तित्वातील धोकादायक अनधिकृत, अधिकृत इमारतींचा; तसेच झोपडपट्टीचा नियोजित विकास करण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम समूह विकास योजनेंतर्गत राबविण्यात येत आहे, याविषयी बोलताना  जिल्हाधिकारी म्हणाले, या उपक्रमांतर्गत एकूण 1 हजार 650 हेक्टर क्षेत्र अधिसूचित करण्यात आले आहे. त्यापैकी कोपरी, राबोडी, टेकडी बंगला, हाजुरी, किसननगर, लोकमान्यनगर असे अंदाजित एकूण 357.13 हेक्टर इतके क्षेत्र अंमलबजावणीसाठी प्रथम टप्प्यात प्राधान्याने देण्यात आले आहे. सिडको आणि महाप्रित या दोन संस्थांसोबत ठाणे महापालिकेने सामंजस्य करार केला आहे. सिडकोमार्फत एकूण 29 हजार 186 इतक्या पुनर्वसन सदनिकांची तर, महाप्रित संस्थेकडून एकूण 14 हजार 71 इतक्या पुनर्वसन सदनिकांची निर्मिती करण्यात येणार आहे. या योजनेचे किसननगर येथील बांधकाम प्रगतीपथावर आहे.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात जागतिक पर्यावरणदिनानिमित्त “मुख्यमंत्री हरित ठाणे अभियान” हाती घेण्यात आले होते. या अभियानाच्या माध्यमातून 15 ऑगस्टपर्यंत एक लाख झाडे लावण्याचा संकल्प पूर्ण करण्यात आला आहे, याबद्दल  कौतुकोद्गार काढून श्री.शिनगारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात बांबू लागवडीस आणि स्थानिक प्रजातींच्या झाडांच्या लागवडीस प्राधान्य व प्रोत्साहनही दिले जात आहे. बांबूचे पर्यावरणीय महत्व लक्षात घेता ज्या क्षेत्रात बांबू लागवड शक्य आहे त्या त्या क्षेत्रात बांबू लागवड करावी, असे सर्वांना आवाहन केले.

श्री.शिनगारे यांनी मादक पदार्थांच्या गैरवापराच्या प्रतिबंध करण्याकरिता व भारताला अंमली पदार्थ मुक्त बनविण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय यांच्यामार्फत “नशा मुक्त भारत अभियान” राबविण्यात येत असून या वर्षाची संकल्पना “विकसित भारत का मंत्र, भारत हो नशे से स्वतंत्र” अशी असून हे अभियान 5 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. आपण सर्व मिळून विकसित भारत हा नशामुक्त भारत असेल, असा संकल्प करुया, असेही आवाहन केले.

महसूल सप्ताहविषयी बोलताना ते म्हणाले, राज्य शासनाने गेल्या वर्षीपासून राबविण्यास सुरुवात केली आहे. यावर्षीही ठाणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये महसूल सप्ताहनिमित्त युवा संवाद, जनसंवाद, माजी सैनिकांसाठी कार्यक्रम, “एक हात मदतीचा दिव्यांगाच्या कल्याणाचा” असे विविध लोकोपयोगी लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात आले. ठाणे जिल्हा प्रशासनाने महसूल सप्ताह अंतर्गत अतिशय चांगले कार्य केले आहे. यापुढेही जिल्हा प्रशासनाकडून गरजू नागरिकांना जास्तीत जास्त योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न सुरुच राहतील. संपूर्ण प्रशासन लोकसेवेसाठी कटिबध्द आहे.

शेवटी आपण भारत देशाच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनाचा हा सोहळा अभिमानाने मोठ्या उत्साहात साजरा करीत आहोत. आपल्या देशाचा वारसांचा गौरव करून देशाची एकात्मता बलशाली करण्याचा व देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रति सन्मान बाळगण्याचा संकल्प करूया. आपल्या भारत देशाला आत्मनिर्भर व विकसित बनविण्यासाठी हातभार लावू या, असे आवाहन करुन पुन:श्च एकदा जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांना भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

या मुख्य ध्वजारोहण सोहळ्यानंतर जिल्हा नियोजन सभागृहात विविध प्रशासकीय, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले.

जिल्हा माहिती कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांचा विशेष गौरव

शासनाच्या व प्रशासनाच्या विविध कार्यक्रमांची, उपक्रमांची, योजनांची व्यापक प्रसिध्दी करण्यामध्ये माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या जिल्हा माहिती कार्यालयाची भूमिका महत्वाची ठरते. ही भूमिका चोख बजावीत असल्याबद्दल जिल्हा माहिती कार्यालयाच्या संदीप गोवळकर (लिपिक), धनंजय कासार (छायाचित्रकार), प्रेम शुक्ला (छायाचित्रकार), राजू भोये (वाहनचालक) आणि सचिन गायकवाड (शिपाई) या कर्मचाऱ्यांचा सन्मानपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आलेल्या इतर अधिकारी/कर्मचारी/विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे- मेजर सागर सावंत, पोलीस निरीक्षक मिलिंद बिरारे, पोलीस कर्मचारी विजय सानप, सोनाली पाटील, कल्याण जिल्हा कारागृह सुभेदार बाळासाहेब कुंभार, रबाळे सहायक अग्निशमन केंद्र अधिकारी श्री.एस.एल.पाटील, श्री.एस.एम.पाटील, श्री.डी.टी.खेडकर, श्री.जी.के.झाटे, अंबरनाथ अग्निशमन केंद्र अधिकारी श्री.व्ही.वाय.मोटे, श्री.व्ही.ए.बाईत, श्री.आर.जी.पवार, श्री.आर.जी.पाटील, तळोजा उप अग्निशमन अधिकारी श्री.एम.पी.पाटील, श्री.ए.एस.रेठरेकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार, सहायक संचालक डॉ.बाळासाहेब सोनावणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे, जिल्हा हिवताप नियंत्रण अधिकारी डॉ.संतोषी शिंदे, लोकराज्य सामाजिक संस्था श्री.संजय सावंत, लोकराज्य कनिष्ठ महाविद्यालय न्यू गर्ल्स स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय त्याचबरोबर शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या न्यू हॉरिझॉन स्कॉलर्स स्कूलचा शौनक गावडे व कौस्तुभ मिटकरी, वसंत विहार हायस्कूल ज्युनिअर कॉलेजची आराध्या सावंत, श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया स्कूलचा सुदर्शन दिपक चव्हाण, सेंट थॉमस इंग्लिश प्रायमरी स्कूलचा स्वराज्य आंबवणे, स्टुडंटस् पोलीस कॅडेट कार्यक्रमांतर्गत मराठी विद्यालय, टेमघरपाडा, भिवंडी (मुख्याध्यापक पंकज फर्डे), उुर्दू शाळा, शांतीनगर, भिवंडी (मुख्याध्यापक मोहम्मद आसिफ), तेलगू शाळा, पद्मानगर, भिवंडी (मुख्याध्यापक श्रीमती रेणुका भोईर).

या संपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाच्या thaneinfo या यू-ट्यूब चॅनलवरुन करण्यात आले होते. यामुळे या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचा आनंद अनेक नागरिकांना घरबसल्या घेता आला. या सोहळ्याचे सूत्रसंचलन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.चारुलता धनके यांनी केले.

000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here