नागरिकांना सेवांची हमी देणारा पथदर्शी प्रकल्प राज्यातील इतर जिल्ह्यातही राबविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
17

कोल्हापूर जिल्ह्यात महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ च्या पथदर्शी प्रकल्पाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ

कोल्हापूर दि. 15 : शासनाच्या विविध सेवा नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत तयार केलेल्या पथदर्शी प्रकल्पाद्वारे निश्चितच होईल. या पथदर्शी प्रकल्पाचे अनुकरण करुन राज्यातील इतर जिल्ह्यातही हा प्रकल्प राबविण्यात येईल असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात सुरू होत असलेल्या पथदर्शी प्रकल्पाचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमासाठी कोल्हापूर येथे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे उपाध्यक्ष तथा आमदार प्रकाश आबिटकर, राज्य लोकसेवा हक्क आयोग पुणे विभागाचे आयुक्त दिलीप शिंदे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. उपस्थित होते. तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्यासह राज्यातील इतर सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, देशाच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या मंगलदिनी आपण एका लोकाभिमुख, राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्मभूमीतून महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पथदर्शी प्रकल्पाची सुरुवात करत आहोत.  हा अधिनियम 2015 मध्ये सुरू झाला असून,  या अंतर्गत शासनाच्या हजारो योजनांचा समावेश करून नागरिकांना तात्काळ व सुलभ सेवा देण्याचे पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत. तथापि, या कायद्याची अजूनही लोकांना तितकीशी माहिती नाही. सेवांचा प्रभावी वापर होऊन कायदा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. पुढे त्यांनी पथदर्शी प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यात सुरु केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले. या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी सातत्याने प्रयत्न करणारे आमदार प्रकाश आबिटकर तसेच पालकमंत्री हसन मुश्रीफ व राज्य उत्पादन शुल्क मंत्री, शंभूराज देसाई यांचेही त्यांनी अभिनंदन केले.

जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकापर्यत सेवा हमी कायदा पोहोचवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने स्वीकारलेली जबाबदारी कौतुकास्पद असून आता शासनाच्या विविध सेवा नागरिकांच्या घरोघरी वेळेत जातील. या अभिनव उपक्रमांद्वारे नागरिक व प्रशासन यांच्यादरम्यान ठोस नातंही निर्माण होईल. जिल्हा प्रशासनाने सुरु केलेल्या घरपोच सेवा, सेवा वाहिनी, आपले सरकार वेब पोर्टल आरटीएस मोबाईल ॲप्लिकेशन, व्हाट्सॲप चॅटबॉट, प्रत्येक तालुक्यात एक आदर्श आपले सरकार सेवा केंद्र तसेच लोकांच्या तक्रारीसाठी सुरु केलेली क्यूआर कोड संकल्पना, कार्यालयांचं मानांकन करुन प्रशासन गतिमान करण्याचे नियोजन या सुविधा कौतुकास्पद असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पथदर्शी प्रकल्पाची सुरुवात झाल्यानंतर या प्रकल्पाविषयी माहिती देणाऱ्या चित्रफितीचे अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध प्रचार प्रसार पुस्तिकांचेही अनावरण संपन्न झाले. यात क्यूआरकोड, मदतीसाठीचा टोल फ्री क्रमांक, सेवांच्या माहितीकरिता व्हॉट्सॲप चॅटबोट यांचेही अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी या कायद्याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी कोल्हापूरची निवड केल्याबद्दल शासनाचे आभार मानले. अस्तित्वात असणाऱ्या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी चांगले नियोजन केल्याचे मंत्री शंभुराज देसाई यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, विधानसभेच्या अधिवेशनात स्थानिक आमदार प्रकाश आबिटकर यांनी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या यशस्वी अंमलबजावणीसाठी लक्षवेधी उपस्थित केली. तसेच त्यांनी त्यासाठी पाठपुरावाही केला. शासनाकडून उत्तर देत असताना कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी, लोकांना सेवा घेत असताना होणारा त्रास कमी करण्यासाठी कायद्याची कडक स्वरूपात अंमलबजावणी करण्याचे ठरविले. हा पायलट प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यातून सुरू करण्याचे ठरविले. आणि कोल्हापूर येथे याबाबत चांगले नियोजन केल्याचे त्यांनी पुढे सांगितले. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले की, सर्वसामान्य माणसांना योग्य पद्धतीने सेवा अंमलबजावणीत या कायद्याचा उपयोग करुन अधिकाधिक पारदर्शक, लोकाभिमुख कारभार करणे ही  प्रशासनाची महत्त्वाची जबाबदारी आहे. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सेवा हमी कायदा व पथदर्शी प्रकल्प काय आहे हे सांगितले तर आभार करवीरचे उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांनी मानले. कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख, निवडलेल्या शाळा, महाविद्यालयांचे शिक्षक, सरपंच व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here