नागरिकांनी आपल्या समस्या व प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी जनता दरबारमध्ये उपस्थित राहावे – पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे आवाहन

0
13

महसूल प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख, गतिमान व पारदर्शक करण्यासाठी महसूल पंधरवडाचे आयोजन

पालघर दि 15 : महाराष्ट्र शासन महसूल विभागामार्फत राज्यात महसूल दिन दरवर्षी दिनांक 1 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येतो.  यावर्षीपासून दिनांक 1 ऑगस्ट 2024 ते दिनांक 15 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये महसूल पंधरवडा- 2024 चे आयोजन करण्यात आले होते.  महसूल प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख, गतिमान व पारदर्शक करण्यासाठी महसूल पंधरवडाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून )तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.

पालघर जिल्हा महसूल पंधरवडा सांगता समारंभाचे आयोजन नियोजन समिती सभागृह ,जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री श्री. चव्हाण बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, खासदार डॉ.हेमंत सवरा,माजी खासदार राजेंद्र गावित,जिल्हाधिकारी गोविंद बोडके,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे,जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील,अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, मुद्रांक जिल्हाधिकारी दीपक पाटील तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आदिवासीबहुल पालघर जिल्ह्याच्या सामाजिक, आर्थिक अभिसरणामध्ये समाजोन्नती करिता केंद्र व राज्य शासनाच्या योजनांद्वारे जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणा प्रयत्नशील आहेत.

शासनाने घोषित केलेल्या अत्यंत महत्त्वकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’, ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ व ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ या तीन महत्त्वपूर्ण योजनांद्वारे महिला, युवा आणि जेष्ठ नागरिकांचे दैनंदिन आयुष्य अधिक सुखकर होणार आहे. यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत एकूण 24 उमेदवारांची निवड जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आली आज या आदेशांचे वाटप करण्यात आले असून  अधिकाधिक उमेदवाराने या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले.

‘सैनिक हो तुमच्यासाठी’ या योजनेंतर्गत मेजर राजेश नायर हे जम्मू आणि काश्मीरमध्ये तैनात असलेल्या 4 राष्ट्रीय रायफल्स युनिटमध्ये नियुक्त करण्यात आले होते. सन 2001 मध्ये, मेजर राजेश नायर यांची नियुक्ती युनिट जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादग्रस्त डोडा जिल्ह्यात तैनात होती. त्यांनी केलेल्या 22 पेक्षा जास्त यशस्वी लष्करी ऑपरेशन्समुळे ते एक लढाऊ आणि समर्पित असे सैनिक होते.

मेजर राजेश नायर यांनी धैर्याने सैनिकांना प्रेरित करून ताकदीने प्रतिहल्ला करण्यासाठी आणि दिलेले कार्य यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिले. मेजर राजेश नायर यांना त्यांच्या धाडसी कृतीसाठी, आणि सर्वोच्च बलिदानासाठी “सेना मेडल” हा शौर्य पुरस्कार देण्यात आला आहे. आज त्याअनुषंगाने याठिकाणी वीरपत्नी  सुप्रिया नायर  यांना शासनाच्या धोरणाप्रमाणे पाच एकर जमीन वाटप आदेश याठिकाणी वितरीत करण्यात आला असल्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.

16 ऑगस्ट रोजी जनता दरबाराचे आयोजन

दिनांक 16 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय,पालघर येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.नागरिकांनी आपल्या समस्या व प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी जनता दरबारामध्ये उपस्थित राहावे असे आवाहन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी नागरिकांना केले.

जनता दरबारामध्ये विविध विभागाचे 17 टेबल लावण्यात आले आहेत तसेच नाव नोंदणी करिता 10 टेबल कार्यरत राहणार आहेत. नागरिकांनी नाव नोंदणी करून संबंधित विभागाच्या टेबलवर जाऊन लेखी स्वरूपात आपल्या अडचणी व प्रश्न मांडावे नागरिकांच्या प्रश्नाचे निवारण करण्यासाठी सर्व विभागाच्या विभाग प्रमुखांनी जनता दरबारामध्ये उपस्थित रहावे असे निर्देश पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी अधिकारी वर्गांना दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here