कुळगाव बदलापूर नगरपरिषद इमारतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

0
14

बदलापूरवासियांना दिले महानगरपालिका करण्याचे आश्वासन

ठाणे,दि.15 (जिमाका) : आज बदलापूर बदलत आहे. लोक बदलापूरला पसंत करु लागले आहेत. लोक बदलापूरला राहायला यायला लागले आहेत. तुम्ही सांगा आम्हाला महानगरपालिका पाहिजे, तेव्हा महानगरपालिका केली जाईल. सरकार शेवटी लोकभावनेचा विचार करणारे आहे. तुमचा आवाज ऐकणारे सरकार आहे, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बदलापूर येथे केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या उर्दू शाळा क्र. ०२ व कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते  लोकार्पण करण्यात आले, त्याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.

यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, सुरेश(बाळ्या) म्हात्रे, आमदार किसन कथोरे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, कुळगाव बदलापूर नगरपरिषदचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड, विविध विभागाचे प्रशासकीय  अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, कुळगाव बदलापूर नगरपरिषदेची ही इमारत भव्यदिव्य आहे. या इमारतीसाठी मी मुख्यमंत्री असल्याने 25 कोटी रुपये देऊ शकलो. शेती व पायाभूत सुविधामध्ये आपण चांगले काम केले आहे. जे प्रकल्प बंद होते ते आपण सुरू केले. लोक उपोषण करतात, आंदोलन करतात, कारण मुख्यमंत्री देणारा आहे. लोकांचा विश्वास आहे. देशामध्ये सर्वात जास्त पायाभूत सुविधा आपल्या महाराष्ट्रात आहेत. परदेशी गुंतवणुकीमध्ये आपला पहिला नंबर आहे. शेतकरी आपला अन्नदाता आहे. त्याला मदत करताना आपण आपला हात आखडता घेतला नाही. हे सरकार शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभे आहे.

आम्ही सांगितले होते की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे रक्षाबंधनच्या अगोदर दोन दिवस आपल्या बँक खात्यात जमा होतील. राज्यात 80 लाख महिलांच्या बँक खात्यात 3 हजार रुपये जमा केले आहेत. हे सरकार जे बोलत आहे, ते करीत आहे. आपल्या अर्जात त्रुटी असतील तर त्या दुरुस्त करुन घेऊ. आपले 31 ऑगस्टनंतर जरी अर्ज आले तरीही आपणाला  जुलै,ऑगस्ट,सप्टेंबर या तिन्ही महिन्याचे पैसे देणार आहोत. आम्ही देणारे आहोत, घेणारे नाही. आमचे सरकार बहिणीच्या खात्यात पैसे भरणारे आहे. आपण वेगाने निर्णय घेतले आहेत.महिलांसाठी 107 निर्णय  आपण घेतले आहेत,असेही यावेळी सांगितले.

देशातील हे पहिले राज्य आहे. तरुणांना प्रशिक्षण पण देत आहे आणि पैसे पण देत आहे.आपल्या राज्यात उद्योग येत आहेत.त्यांना मनुष्यबळ आपण त्यांना देत आहोत. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजेनमधून 547 तरुणांना ठाणे महानगरपालिकेने नियुक्तीपत्र दिले आहेत.तसेच आपणही कुळगाव बदलापूर  नगरपरिषदेमध्ये स्थानिक तरुणांना रोजगार द्या. आपण उच्च शिक्षणासाठी मुलींना मोफत शिक्षण दिले आहे.मुलींना यापुढे कोणतेही शिक्षणासाठी पैसे भरावे लागणार नाहीत. शेतकऱ्यांना मोफत वीज योजना सुरु केली आहे.ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरु करण्यात आली आहे.

या सर्व योजना चालू राहणार आहेत. अफवांवर विश्वास ठेवू नका. जे आपणास आवश्यक आहे, ते आपणास देण्यात येईल.असेही यावेळी श्री.शिंदे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here