गोंदिया दि. 15-राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थी बहिणींशी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला. योजना अतिशय चांगली असून आम्हाला लाभ मिळाल्याने आम्ही आनंदी असल्याच्या प्रतिक्रिया सहभागी महिलांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनलाईन बैठकीद्वारे हा संवाद साधला. फुलचुर आणि खमारी येथील ज्या महिला लाभार्थ्यांना 2 महिन्यांचा 3000 रुपयांचा प्रत्यक्ष लाभ ज्यांच्या बँक खात्यात जमा झाला त्या महिलांशी जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्र्यांनी व्हीसीद्वारे संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी प्रजित नायर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद मुरुंगानंथम एम , जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास विभाग जिल्हा परिषद संजय गणवीर , नगर परिषद मुख्याधिकारी गोंदिया व तिरोडा , बाल विकास प्रकल्प अधिकारी गोंदिया व तिरोडा, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका तसेच प्रातिनिधिक स्वरूपात काही लाभार्थी महिला प्रत्यक्ष उपस्थित होत्या.
यावेळी बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की सदर योजनेचा लाभ सदैव सुरू राहणार असून तो कधींही बंद होणार नाही. तसेच ही योजना यशस्वी करण्यामागे शासनाच्या सर्व विभागाचे सहकार्य मोलाचे आहे.
युवा कार्य प्रशिक्षण योजना, तीर्थ दर्शन योजना, वयोश्री योजना, बळीराजा मोफत वीज योजना, अन्नपुर्णा योजना, मुलींना मोफत शिक्षण, नुकसानग्रस्तांना मदत वाटप, आनंदाचा शिधा वाटप या योजनांचाही आमच्या कुटुंबातील सदस्यांना लाभ होणार असल्याचे सहभागी महिला लाभार्थ्यांनी सांगितले.
खमारी येथील दुर्गा सेलोकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेशी संवाद साधला. या योजनेच्या अंमलबजावणीवर समाधान व्यक्त करत यामुळे आर्थिकरित्या आत्मनिर्भर झाल्याची भावना या माता भगिनींनी व्यक्त केली.
000