चंद्रपूर जिल्ह्याला कृषी क्षेत्रात अग्रेसर करणार – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही

0
17

जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन

चंद्रपूर, दि. 16 : विदर्भ हा सुरवातीपासूनच हरीतक्रांतीचा प्रदेश राहिला आहे. यात धान उत्पादक जिल्हा म्हणून चंद्रपूरचेही योगदान आहे. जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाला कसे सुखी करता येईल, याचा संकल्प करण्यात आला असून जिल्ह्यात ‘मिशन जयकिसान’ अंतर्गत नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. कृषी विभागाच्या 16 एकर जमिनीवर कृषी तंत्रज्ञानाची माहिती देण्याकरिता सुसज्ज बाजारहाट, हायटेक नर्सरी, खाद्य संस्कृती विकसीत करण्यासाठी फूडकोर्ट आदींकरीता 65 कोटी रुपये मंजूर केले असून चंद्रपूर जिल्ह्याला कृषी क्षेत्रात अग्रेसर करण्याचा आपला मानस आहे, अशी ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी भवन येथे आयोजित रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन करतांना पालकमंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी,सी., सहायक जिल्हाधिकारी कश्मिरा संखे, आत्माच्या प्रकल्प संचालक प्रिती हिरळकर, कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, डॉ. मंगेश गुलवाडे, ब्रिजभुषण पाझारे, बंडू गौरकार आदी उपस्थित होते.

‘जय जवान, जय किसान’ चा नारा देणा-या शेतकरी बांधवांना सुखी करण्याचा संकल्प केला आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, वनमंत्री म्हणून माझ्याकडे ‘रान’ तर भाजी कृषी विभागाकडे आहे. रानभाजी, वनऔषधी यासाठी जिल्ह्यात नैसर्गिक वातावरण आहे. लोकांना निरोगी आयुष्यासाठी या रानभाज्यांचे महत्व सांगता आले पाहिजे. योग्य पध्दतीने समोर गेलो तर वनऔषधी आणि रानभाजी आपण निर्यातही करू शकतो. त्यामुळे शेतकरी आणि शेती हे दोन्ही घटक उर्जितावस्थेत येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पुढे पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपुरात कृषी विभागाच्या जागेवर अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञान केंद्र तसेच नाविण्यपूर्ण कल्पनेतून फूडकोर्ट तयार करण्यासाठी 64 कोटी 99 लक्ष रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. फूटकोर्टच्या माध्यमातून आपली खाद्य संस्कृती विकसीत होईल. विविध प्रकारच्या रानभाज्या कधी खाव्यात, कशा खाव्यात आणि त्याचा उपयोग, या बाबी आपल्याला सुरवातीला ‘आजीच्या बटव्यातून’ कळत होत्या. आता मात्र 10 मिनिटात मोबाईलवरून पिझ्झा येतो आहे. काटवलच्या भाजीमध्ये कोंबडी आणि बकरीच्या मांसाहारापेक्षा जास्त प्रोटीन्स मिळतात. लोकांना याचे महत्व अधोरेखांकीत करत उत्पादन वाढविले पाहिजे. तसेच मुंगण्याच्या शेंगा, पाने विकसीत करण्याची गरज आहे. तसेच बांबुची लागवडही फायदेशीर ठरू शकते, असे पालकमंत्री म्हणाले.

जिल्ह्यातील भाजीपालाही निर्यात होऊ शकतो : जगात दुस-या क्रमांकाचा भाजीपाला भारतात पिकतो. पहिला क्रमांक चीन या देशाचा आहे. भाजीपाल्याचे उत्पादन वाढविण्यासाठी वरोरा तालुक्यातील ऐकार्जुना येथे 31 कोटी 90 लक्ष रुपये खर्च करून भाजीपाला संशोधन केंद्र उभे राहत आहे. त्यातून दर्जेदार उत्पादन येईल आणि हळूहळू भाजीपाला निर्यात होऊ शकतो, अशी अपेक्षा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

लोकांपर्यंत रानभाजीचे महत्व पोहचावे : जिल्हाधिकारी विनय गौडा

सध्या अनेक आजारांचे प्रमाण वाढले आहे. आपल्या आहारातून अनेक प्रकारची रसायने  पोटात जातात. त्याचा विपरीत परिणाम आपल्या आरोग्यावर होत आहे. यावर मात करण्यासाठी व सकस आहारासाठी रानभाज्यांचे महत्व लोकांपर्यंत पोहचावे, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच पौष्टिक तृणधान्यातून शरीराला चांगला आहार मिळू शकतो. शेतक-यांनी अधिक जागृत होऊन पौष्टिक तृणधान्याचे उत्पादन करावे, असे आवाहनही जिल्हाधिका-यांनी केले.

रानभाज्यांचे 18 स्टॉल: रानभाजी महोत्सवात एकूण 18 स्टॉल लावण्यात आले. यात चंद्रपूर आणि भद्रावती तालुक्यातून प्रत्येकी 5 स्टॉल, पोंभुर्णा आणि सिंदेवाही येथील प्रत्येकी  2 स्टॉल, आणि नागभीड, कोरपना, बल्लारपूर, गोंडपिपरी तालुक्यातून प्रत्येकी 1 स्टॉल लावण्यात आला आहे. यात धानभाजी, केला भाजी, कुंजीर भाजी, गोपीन भाजी, कुकुरडा, खापरखुरी भाजी, तरोटा, कुड्याचे फूल, काटवल, फेटरे, भुईनिंब काढा, इगडोडी, धोपा, करवंद, विविध प्रकारचे लोणचे, बांबु वायदे आदींचा समावेश होता.

शेतक-यांना धनादेशाचे वाटप: यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शेतक-यांना शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. यात सुरेश गरमडे, महादेव आदे, परसुराम लेळांगे, नामदेव डडमल, विमला गेडाम यांचा समावेश होता. तर गोदाम बांधकामासाठी कांचणी प्रोड्यूसर कंपनीला 12 लक्ष 50 हजार रुपयांचा धनादेश तसेच आनंद वासाडे यांच्या कुटुंबियांना गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेची सानुग्रह रक्कम देण्यात आली.

प्रास्ताविकातून आत्माच्या प्रकल्प संचालक प्रिती हिरळकर म्हणाल्या, कृषी भवन येथे दोन दिवसीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दैनंदिन आहारात भाज्यांचे अनन्यसाधारण महत्व आहे. निसर्गात मोठ्या प्रमाणात रानभाज्या आढळतात. चंद्रपूर जिल्ह्यात जवळपास 55 रानभाज्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here