७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा; महाराष्ट्राला पाच पुरस्कार
नवी दिल्ली, दि. 16 : ‘ वाळवी ’ या चित्रपटाला मराठी भाषेतील सर्वोत्तम चित्रपटाचा, ‘मर्मर्स ऑफ द जंगल या माहितीपटाला नॉन फिचर फिल्म श्रेणीतील सर्वोत्तम माहितीपटाचा पुरस्कार, “आणखी एक मोहेंजो दारो” या माहितीपटाला सर्वोत्तम जीवनचरित्रात्मक ऐतिहासिक पुनर्निर्माण, संकलन चित्रपटाचा, ‘वारसा’(लेगसी)’ या माहितीपटाला सर्वोत्तम कला-संस्कृती चित्रपटाचा तर सर्वोत्तम निवेदन आणि आवाजासाठी सुमंत शिंदे यांना आज राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहेत.
येथील नॅशनल मिडीया सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत वर्ष 2022 साठीच्या 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. याप्रसंगी ज्यूरीमध्ये फीचर फिल्म ज्यूरीचे अध्यक्ष राहुल रवैल, नॉन-फीचर फिल्म ज्यूरीचे अध्यक्ष निला मधब पांडा, आणि बेस्ट राइटिंग ऑन सिनेमा ज्यूरीचे अध्यक्ष गंगाधर मुढालैर हे उपस्थित होते.
फिचर फिल्म श्रेणीत 38 पुरस्कार जाहीर झाले. यात विविध भाषेतील उत्कृष्ट चित्रपटांचाही समावेश आहे. तर नॉन फिचर फिल्ममध्ये विविध श्रेणीमध्ये 18 पुरस्कार जाहीर झाले.
‘वाळवी’ ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट
फिचर फिल्म श्रेणीत वर्ष 2022 साठी मराठी भाषेमधून ‘वाळवी’ हा चित्रपट सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला. वाळवी हा परेश मोकाशी यांनी दिग्दर्शित केला आहे . तर झी स्टुडिओजनं या चित्रपटाची निर्मिती केली आहे. डार्क कॉमेडी प्रकारातला हा रहस्यपट आहे. या चित्रपटात स्वप्नील जोशी, अनिता दाते केळकर, सुबोध भावे आणि शिवानी सुर्वे यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
सर्वोत्तम माहितीपटाचा पुरस्कार ‘मर्मर्स ऑफ द जंगल
नॉन फिचर फिल्म श्रेणीतील सर्वोत्तम माहितीपटाचा पुरस्कार ‘मर्मर्स ऑफ द जंगल’या लघुपटाला जाहीर झाला आहे. “मर्मर्स ऑफ द जंगल” हा एक लघुपट आहे, जो भारताच्या नैसर्गिक वारशाच्या, विशेषतः जंगलांच्या आणि वन्यजीवनाच्या संरक्षणाच्या आव्हानांवर प्रकाश टाकतो. हा लघुपट भारतीय जंगलांचे महत्त्व, त्यांच्यातील विविधता, आणि मानवाच्या हस्तक्षेपामुळे होणारा -हास यावर आधारित आहे. लघुपटाच्या माध्यमातून जंगलांचे संवर्धन आणि वन्यजीव संरक्षणाची आवश्यकता अधोरेखित केले आहे.
या लघुपटात भारतीय जंगलातील विविध वन्यजीव, वनस्पती, आणि त्यांच्याशी संबंधित समुदायांचे जीवन दर्शविण्यात आले आहे. प्रेक्षकांना जंगलाच्या संरक्षणाची जाणीव करून देणे आणि त्यांच्यामध्ये या मुद्द्यांबद्दल संवेदनशीलता निर्माण करणे, या माहितीपटाव्दारे संदेश देण्यात आला आहे.
“आणखी एक मोहेन्जो दडो” यास सर्वोत्तम जीवनचरित्रात्मक
ऐतिहासिक पुनर्निर्माण संकलन चित्रपटाचा पुरस्कार
नॉन फिचर फिल्म श्रेणीतील सर्वोत्तम जीवनचरित्रात्मक ऐतिहासिक पुनर्निर्माण संकलन चित्रपटाचा पुरस्कार “आणखी एक मोहेन्जो दडो” या चित्रपटाला जाहीर झाला आहे. या चित्रपटाचे उद्दिष्ट म्हणजे प्राचीन मोहेन्जो दडो संस्कृतीच्या गूढतेला आणि इतिहासातील या महान संस्कृतीच्या पुनर्निर्माणाला उजाळा देण्याचा महत्व देणारा चित्रपट आहे.
चित्रपटात मोहेन्जो दडोच्या उत्खननांमध्ये आढळलेल्या पुरातत्त्वीय अवशेषांचा अभ्यास करून त्या काळातील समाजजीवन, संस्कृती, वास्तुकला आणि तंत्रज्ञानाचे पुनर्निर्माण करण्यात आले आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी संशोधनाच्या आधारे मोहेन्जो दडोची समृद्ध परंपरा, त्यातील रहस्य आणि हडप्पा संस्कृतीचा विकास कसा झाला याचे बारकाईने चित्रण केले आहे.
या चित्रपटाने इतिहासातील प्राचीन सभ्यतेच्या महत्वाच्या पैलूंना प्रकाशात आणले असून प्रेक्षकांना त्या काळाच्या जीवनशैलीची सजीव अनुभूती प्रेक्षकांना दिली आहे. चित्रपटाचे चित्रण, निर्देशन आणि ऐतिहासिक सत्यता यामुळेच याला सर्वोत्तम जीवनचरित्रात्मक ऐतिहासिक पुनर्निर्माण संकलन चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
सर्वोत्तम कला-संस्कृती चित्रपटाचा पुरस्कार ‘वारसा (लेगसी)’
नॉन फिचर फिल्म श्रेणीतील सर्वोत्तम कला-संस्कृती चित्रपटाचा पुरस्कार “वारसा” (लेगसी) या माहितीपटाला जाहीर झाला. यामध्ये शिवकालीन युद्ध कलेवर आधारित माहितीपटाला देखील पुरस्कार देण्यात आला आहे. ‘वारसा’ या माहितीपटाची निर्मिती कोल्हापुरातील सचिन बाळासाहेब सूर्यवंशी यांनी केली आहे तर या माहितीपटाला बेस्ट फिल्म नॉन फिक्शन गटातून फिल्मफेअर पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक युद्धतंत्र निर्माण केले होते. त्याचा वारसा आजही कोल्हापुरातील लोक जपत असून याला शिवकालीन युद्ध कला या नावानेही ओळखले जाते.या माहितीपटातून याच युद्ध कलेचा वारसा कोल्हापुरातील स्थानिक कसे जपतात यासाठी सतत प्रयत्नरत असल्याचे चित्रण केले आहे.
सर्वोत्तम निवेदन आणि आवाजासाठी सुमंत शिंदे यांना पुरस्कार जाहिर
नॉन फिचर फिल्म श्रेणीतील सर्वोत्तम निवेदन आणि आवाजाचा ‘मर्मर्स ऑफ द जंगल’या माहितीपटासाठी सुमंत शिंदे यांना सर्वोत्तम निवेदन आणि आवाजाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
सोबतच सर्वोत्तम बॉलिवूड दिग्दर्शक म्हणून सूरज बडजात्या यांना ‘ऊंचाई’ चित्रपटासाठी, केजीएफ 1: चॅप्टर 2′ सर्वोत्तम कन्नड चित्रपट आणि सर्वोत्तम स्टंट कोरियोग्राफीचा पुरस्कार, ‘काबेरी अंतरधान’ सर्वोत्तम बंगाली चित्रपट, ‘ब्रह्मास्त्र’ या हिंदी चित्रपटासाठी बॉलिवुड संगीतकार प्रीतमला सर्वोत्तम संगीतकाराचा पुरस्कार, ‘फौजा’ साठी नऊशाद सदार खान यांना सर्वोत्तम गीतकाराचा पुरस्कार, ‘अपराजितो’ ला सर्वोत्तम निर्मिती रचनाचा पुरस्कार, ‘कांतारा’साठी ऋषभ शेट्टीला सर्वोत्तम अभिनेता, ‘थिरुचित्राम्बलम’साठी नित्या मेनन तर ‘कच्छ एक्सप्रेस’साठी मानसी पारिख यांना सर्वोत्तम अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहे.
0000