आश्रमशाळांमधील पोषण आहारात गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार – पालकमंत्री रविंद्र चव्हाण

0
10

पालघर दि 16 : काही दिवसांपूर्वी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू अंतर्गत आश्रमशाळांमधील 300 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा झाल्याची दुर्घटना घडली होती. असे प्रकार बंद करण्यासाठी आश्रमशाळांमधील पोषण आहारात गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.

कांबळगाव येथील आश्रम शाळेच्या परिसरात असलेल्या मध्यवर्ती स्वयंपाकगृहाला पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.

पाहणी दौऱ्यावेळी पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम खासदार डॉ. हेमंत सवरा आदी मान्यवर उपस्थित होते. पोषण आहाराबाबत इतरही काही तक्रारी निर्माण झाल्या होत्या. जिल्हा प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी या घटनेची अद्ययावत माहिती जाणून घेतली असे पालकमंत्री श्री.चव्हाण यांनी सांगितले.

पोषण आहार बनवत असताना यासाठी असणाऱ्या आदर्श पद्धती (sop) चे पालन केले जात नसल्याचे प्रथमदर्शनी लक्षात आले असून या सर्व बाबींची नियमित देखरेख करणे गरजेचे आहे. याबाबत जिल्हाधिकारी गोविंद बोडके आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. २० ऑगस्टला याप्रकरणी विस्तृत अहवाल सादर करण्यात येणार असून कोणी हेतुपुरस्सर असे गैरप्रकार करत असेल, तर त्यावर कठोर कारवाई केली जाईल असे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी आश्रमशाळेतील पोषण आहार व्यवस्थेची पाहणी केली. विद्यार्थी आणि शिक्षकांसोबत चर्चा करून त्यांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेतल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here