मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत होणारे महाशिबिर यशस्वी करावे – पालकमंत्री दादाजी भुसे

0
11

तयारीचा आढावा घेऊन कार्यक्रमस्थळाची केली पाहणी

नाशिक, दि. २० ऑगस्ट, २०२४ (जि. मा. का. वृत्तसेवा) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत होणारे महाशिबिर संवेदनशीलतेने व जबाबदारीने सूक्ष्म नियोजन करून यशस्वी करावे, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आज दिले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस महिला भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या योजनेसह महिलांविषयक अन्य कल्याणकारी योजनांच्या लाभार्थींशी संवाद व योजनांची प्रचार प्रसिद्धी होण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत शुक्रवार, दि. २३ ऑगस्ट रोजी सिटी बस लिंक डेपो शेजारील मैदानात हे महाशिबिर होत आहे. या महाशिबिरासाठी जवळपास ५० हजार लाभार्थी उपस्थित राहण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन नियोजन करत आहे. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी महाशिबिराच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेतला.

नियोजन भवन सभागृहात झालेल्या या बैठकीस खासदार शोभा बच्छाव, आमदार सीमा हिरे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषद प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, महानगरपालिका अतिरीक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्यासह संबंधित सर्व यंत्रणांचे प्रमुख उपस्थितीत होते.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास ११ लाखहून अधिक लाभार्थी नोंदणी झाल्याबद्दल समाधान व्यक्त करुन पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, उपस्थित महिलांना शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती होण्यासाठी फलक लावावेत. त्यांच्या आरोग्य तपासणीसाठी कार्यक्रमस्थळाजवळ शिबिर आयोजित करावे. या महिलांची कसल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, यासाठी विशेष खबरदारी घ्यावी. पार्किंगची सुव्यवस्थित आखणी करावी. शहर व जिल्ह्यातून या कार्यक्रमासाठी बसेस येणार आहेत. त्या अनुषंगाने शहर व ग्रामीण वाहतुकीचे नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. यावेळी महाशिबिरासाठी नियुक्त नोडल अधिकाऱ्यांनी त्याना नेमून दिलेल्या कामासंदर्भात केलेल्या नियोजनाची सविस्तर माहिती सादर केली.

कार्यक्रमस्थळाची केली पाहणी

दरम्यान बैठकीपूर्वी पालकमंत्री श्री. भुसे यांनी कार्यक्रमस्थळास भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी मुख्य सभा मंडप, मान्यवर पार्किंग, त्याचबरोबर लाभार्थी व नागरिकांची बैठक व्यवस्था, दिव्यांगांसाठी रॅम्पची व्यवस्था, शासकीय विभागांमार्फत तसेच बचतगटामार्फत लावण्यात येणारे विविध स्टॉल, वाहन पार्किंग व्यवस्था आदिंची पाहणी केली.

यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी लाभार्थ्यांना कार्यक्रमाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये याकरिता आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या व सोईसुविधा पुरविण्याच्या सूचना सर्व विभागाच्या संबंधितांना दिल्या. तसेच वाहनतळ व्यवस्था व लाभार्थ्यांच्या वाहतूक व्यवस्थेबरोबरच पिण्याचे पाणी, शौचालय सुविधा आदिबाबत संबंधितांना सूचना केल्या.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here