बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमिवर सुरक्षा योजनांचा घेतला आढावा
नाशिक, दि. २० ऑगस्ट, २०२४ (जि. मा. का. वृत्तसेवा) : बदलापूर येथील अनुचित घटनेच्या पार्श्वभूमिवर शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या सुरक्षेबाबत संबंधित यंत्रणांनी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आज दिले.
बदलापूर येथील अनुचित घटनेच्या पार्श्वभूमिवर पालकमंत्री दादाजी भुसे यांनी वेळीच खबरदारी म्हणून जिल्ह्यात अशी घटना घडू नये यासाठी शिक्षण संस्था व शाळांमध्ये करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा तात्काळ आढावा घेतला. तसेच संस्थाचालक, प्राचार्य यांच्याशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेतली.
नियोजन भवन सभागृहात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषद प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) विक्रम देशमाने, प्राथमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांच्यासह शिक्षणसंस्था चालक, प्राचार्य, शिक्षक उपस्थित होते.
बदलापूर येथील अनुचित घटना दुर्दैवी असल्याचे सांगून पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, शालेय विद्यार्थ्यांच्या विशेषतः मुलींच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजनांसंदर्भात शासन स्तरावरून वेळोवेळी आदेशित करण्यात आले आहे. या अनुषंगाने शाळा व परिसरात सीसीटीव्ही लावावेत. तक्रार पेटी बसवावी. विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठण करावे. याच बरोबर प्रशासनाकडून शाळा परिसरात शाळा भरताना व सुटताना पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. यासाठी महानगरपालिका शिक्षण विभाग, जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांनी पोलीस प्रशासनाशी समन्वय साधावा. पोलीस विभागाला जिल्हा नियोजन समितीमधून वाहने उपलब्ध करून दिली आहेत. आवश्यकतेनुसार पोलिसांनी गस्त घालावी. दामिनी पथकांनी प्रभावी कामगिरी करावी. तसेच संस्थाचालकांनी खाजगी सुरक्षा नेमण्यापूर्वी त्यांची चारित्र्य पडताळणी करून घ्यावी, असे त्यांनी यावेळी सूचित केले. अनुदानित शाळांतील रिक्त पदे भरण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तसेच, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व शिक्षण विभागाने त्यांना नेमून दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे त्यांनी सूचित केले.
000