मुंबई, दि.23 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत 65 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात म्हणून एकवेळ एकरकमी रुपये 3 हजार त्यांच्या खात्यात थेट वितरण करण्यासाठी राज्यात “मुख्यमंत्री वयोश्री योजना” राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी राज्यात 2 लाख 14 हजार 978 अर्ज पात्र झाले आहेत.
राज्यात मुंबई विभागात 29 हजार 99, नाशिक विभागात 27 हजार 54, पुणे विभागात 74 हजार 671, अमरावती विभागात 10 हजार 179 नागपूर विभागात, 45 हजार 702, छत्रपती संभाजीनगर विभागात 6 हजार 257, लातूर विभागात 22 हजार 16 अर्ज पात्र झाले आहेत. सर्वात जास्त पात्र अर्ज कोल्हापूर जिल्ह्यात 57 हजार 399 झाले आहेत. अति दुर्गम गडचिरोली जिल्ह्यातही 24 हजार 998 अर्ज पात्र झाले आहेत.
ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने /उपकरणे खरेदी करणे करिता तसेच त्यांचे मन:स्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादी द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता या योजनेच्या माध्यमातून 3 हजार रुपये थेट लाभ हस्तांतरण (DBT) व्दारे त्यांना मिळणार आहे.
पात्र ज्येष्ठ लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता आणि दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने उपकरणे खरेदी करता येतील, त्यामध्ये चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड ,स्टिक, व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी-ब्रेक्स, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर यांचा समावेश असून राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योग उपचार केंद्र मनस्वास्थ्य केंद्र, मनशक्ती केंद्र / प्रशिक्षण केंद्र येथे त्यांना सहभागी होता येणार आहे.
या योजनेच्या अधिक माहितीसाठी जिल्ह्यांच्या सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
0000
शैलजा पाटील/विसंअ