‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेतून हक्काचा आधार मिळाल्याची भावना

0
12

नाशिक, दि.२३ : राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेने हक्काचा आधार मिळाला असल्याची तसेच आपल्या स्वप्नपूर्तीसाठी या योजनेतून मिळालेल्या रकमेचा विनियोग करता येईल, अशी भावना मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानासाठी आलेल्या बहिणींनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या निमित्ताने तपोवन परिसरातील मोदी मैदान येथे हजारोंच्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद त्यांच्यातील आत्मविश्वास दर्शवत होता.

रक्षाबंधनचा सण गोड झाला – मोनाली खैरनार

मालेगाव तालुक्यातील वडगाव येथील मोनाली खैरनार यांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाल्याचा आनंद त्यांच्या डोळ्यात दिसत होता. ‘गेल्या आठवड्यात रक्षाबंधनच्या एक दोन दिवस आधीची घटना. सण जवळ आला होता, पण हातात पैसे नव्हते, खूप चणचण होती, मुलीला कपडे घ्यायचे होते, राख्या खरेदी केलेल्या नव्हत्या आणि इतक्यात…माझ्या फोनवर बँक खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाल्याचा मेसेज आला….!” आणि माझी चिंता मिटली….’ अशा शब्दात भावना व्यक्त करताना त्यांच्या डोळ्यात आसवांनी गर्दी केली होती.

सोन्यासारख्या भावाची सोनेरी आठवण – पुण्याबाई गुंड

या रक्षाबंधनाच्या सणाला माझा लाडक्या भावाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून तीन हजार रुपये जमा केले आणि माझी इच्छा पूर्ण झाली. आज मी सगळ्यांना कौतुकाने सांगते लाडकी बहीण योजनेच्या पैशातून डोरलं (मंगळसूत्र) केलं, अशा शब्दात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पेगलवाडी गावातील पुण्याबाई गुंड यांनी आपल्या भावना मांडल्या.

भेट भावाची, ठेव मुलांच्या भविष्याची – निलोफर खान

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनापासून आभार मानते. या योजनेचा अर्ज करताना मला कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही. माझ्या खात्यात बरोबर तीन हजार रुपये जमा झाले. या योजनेतून मिळालेले पैसे भावाची भेट म्हणून माझ्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी वापरणार आहे, अशी भावना व्यक्त केली नाशिक रोड गोरेवाडी येथील निलोफर खान यांनी व्यक्त केली.

महिलांच्या अनेक योजनांची शिदोरी शासनाकडून भेट – गीतांजली माळोकर

शासनाने केवळ ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेचा लाभ दिला नसून महिलांना अनेक कल्याणकारी योजनांची शिदोरी दिली. या योजनांच्या मदतीने आम्ही आमच्या आर्थिक गरजा पूर्ण करणार आहोत. शासनाचे मनापासून आभार, अशी भावना येवला तालुक्यातील गीतांजली माळोकर यांनी व्यक्त केली.

संसाराला हातभार लाभला – स्वाती फसाळे

मी आधी काटकसर करून पैसे साठवत होते. आता माझ्या बँक खात्यातच ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेचे पैसे आले. या पैशांची संसाराला मदत होईल. माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी हे पैसे अडचणीच्या काळात नक्की उपयोगी पडतील. बाजारात गेल्यावर घरासाठी, मुलांसाठी, स्वतःसाठी खरेदी करताना आता हात आखडता नसेल. या पैशातून मी सासू-सासऱ्यांची औषधे घेईन…हे बोल आहेत स्वाती फसाळे महिला भगिनीचे.
00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here