पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला विविध योजनांच्या अंमलबजावणीचा व प्रकल्पांच्या कामांचा आढावा

सातारा दि.26 (जिमाका): पाटण तालुक्यातील उरुल येथील लघु पाटबंधारे प्रकल्प, मल्हारपेठ येथील ग्रामीण रुग्णालय या प्रकल्पांचा तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना व पाटण तालुक्यातील पाणंद रस्त्यांच्या कामांचा आढावा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, पाटणचे तहसीलदार अनंत गुरव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, रोहिणी ढवळे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

उरुल येथील लघु पाटबंधारे प्रकल्पाचा आढावा पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, या प्रकल्पाला निधी उपलब्ध आहे. तरीही काम अपूर्ण आहे. प्रकल्पाच्या कामाची लवकर सुरुवात करुन येत्या 2 महिन्यात काम पूर्ण करावे, अशा सूचना केल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत आत्तापर्यंत 7 लाख 9 हजार प्रकरणांना मंजूरी देण्यात आली आहे. नव्याने 1 लाख 87 हजार प्रकरणांना मंजूरी देण्यात आली आहे. ज्या अर्जाबाबत त्रुटी आहेत त्या त्रुटी लवकरात लवकर पूर्ण कराव्यात, असे सांगून या योजनेंतर्गत एकही पात्र महिला लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. त्याचबरोबर मल्हारपेठ येथील ग्रामीण रुग्णालयाच्या जागेचा प्रस्ताव त्वरीत शासनाकडे पाठवावा. तसेच कर्मचाऱ्यांच्या निवास्थानासाठी पर्यायी जागा उपलब्ध करुन घ्यावी अशा सूचनाही केल्या.

पाटण तालुक्यातील पाणंद रस्त्यांची मंजूर कामे सुरु करुन शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी मार्ग खुला करावा, असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, मुख्यमंत्री तिर्थ दर्शन योजनेंतर्गत जिल्ह्याला 1 हजारचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी चर्चा करुन लवकरच एक टीम तिर्थदर्शनासाठी पाठविण्यात येईल, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी बैठकीत सांगितले.

0000