राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत बाबी लागू करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न प्रशंसनीय – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

0
7

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचा पहिला पदवीप्रदान समारंभ संपन्न

पुणे, दि. २८: संशोधन चलित शिक्षण, आंतरविद्याशाखीय शिक्षण आणि शैक्षणिक बाबींसाठी उद्योगांसमवेत सहयोग या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत बाबी लागू करण्याचा सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचा प्रयत्न प्रशंसनीय आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी काढले.

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या पहिल्या पदवीप्रदान समारंभात राज्यपाल बोलत होते. यावेळी विद्यापीठाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी, कुलगुरू प्रा. सुनील भिरुड, कुलसचिव डॉ. दयाराम सोनवणे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. यशोधरा हरिभक्त आदी उपस्थित होते.

सीओईपी ही संस्था शैक्षणिक उत्कृष्टतेची दीपस्तंभ असून संस्थेच्या पहिल्या पदवीदान समारंभास उपस्थित राहताना आनंद होत असल्याचे सांगून राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणाले, ‘पूर्वेकडील ऑक्सफर्ड’ आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे पुणे शहर दीर्घकाळापासून शिक्षणाचे माहेरघर आणि सांस्कृतिक पुनर्जागरणाचे केंद्र आहे. ही संस्था केवळ शहरच नव्हे तर संपूर्ण राज्य आणि संपूर्ण देशात तंत्रज्ञानातील नवकल्पना आणि शैक्षणिक विद्वत्तेचे केंद्र म्हणून आपली एक वेगळी प्रतिष्ठा जपत असताना भरभराट करत आहे.

तांत्रिक प्रगती, शैक्षणिक, संशोधन आणि विशेषत: महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात सीओईपीने मोठी प्रगती केली आहे. महिला सक्षमीकरणासाठी विद्यापीठाची दृढ वचनबद्धता उल्लेखनीय आज पदवी मिळविणाऱ्या मुलींच्या मोठ्या संख्येतून दिसून येते. पदवीदान समारंभातील दीक्षांत मिरवणुकीचे नेतृत्व एक महिला करत असल्याचे पाहून विद्वान, नेतृत्व आणि बदल घडवणाऱ्या म्हणून स्वतःची भरभराट करू शकतील अशा महिलांसाठी सर्वसमावेशक वातावरणास प्रोत्साहन देण्याची विद्यापीठाची समर्पण भावना दिसून येते, असेही राज्यपाल म्हणाले.

ते पुढे बोलताना म्हणाले, ‘स्टडी इन इंडिया’ उपक्रमाच्या माध्यमातून भारतातील विविध राज्ये तसेच जगभरातील देशांतील विद्यार्थ्यांचे स्वागत करून विविधतेला चालना देण्याचे विद्यापीठाचे प्रयत्न विशेष मान्यता मिळण्यासाठी पात्र आहेत. ही समृद्ध विविधता केवळ विद्यार्थ्यांचा शैक्षणिक अनुभवच वाढवत नाही तर त्यांना जागतिक नागरिक बनण्यासाठी, सीमांचे बंधन तोडून आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज करते. सीओईपी सारख्या संस्थांद्वारेच आपण एक स्वावलंबी भारत घडवू, जिथे ज्ञान आणि कौशल्य विकास हातात हात घालून चालेल, आपल्या तरुणांना प्रगती आणि परिवर्तनाचे अग्रदूत होण्यासाठी सक्षम करेल, असे प्रतिपादनही त्यांनी केले.

आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याच्या अनुषंगाने माहिती देताना राज्यपाल म्हणाले, या विद्यापीठाचा उद्देश हा आदिवासींना केवळ आदिवासी म्हणून ठेवण्याचा नव्हे तर त्यांच्यात जगाशी स्पर्धा करण्याची क्षमता निर्माण करणे हा असावा.

आपल्या देशाची अर्थव्यवस्था सध्या जगात पाचव्या क्रमांकाची असून २०४७ पर्यंत जगात तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था व्हावी यासाठी प्रयत्न आहेत. त्यासाठी आपल्यासारख्या प्रशिक्षित आणि उच्चशिक्षित विद्यार्थ्यांकडून खूप अपेक्षा असून विकसीत भारत घडविण्याच्या प्रक्रियेत तुम्ही नक्कीच योगदान द्याल, असा विश्वासही राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.

देशभरातील शिक्षण पद्धतीत अमूलाग्र सुधारणांच्या दृष्टीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२० ला प्रतिसाद मिळत आहे. आज जग गतीने बदलत असताना आपल्याला एकच अभ्यासक्रम वर्षानुवर्षे चालू ठेवता येणार नाही. बाजारपेठेतील गरजा, मागणीशी सुसंगता असणारा अभ्यासक्रम असणे आवश्यक आहे. लेखी अभ्यासक्रम (थिअरी) आणि प्रात्यक्षिक यांच्यात अत्यंत जवळचा समन्वय गरजेचा आहे. वेगवेगळ्या विषयांची आवड असलेल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विद्याशाखांचा अभ्यासक्रम शिकता येणे आवश्यक आहे, असेही राज्यपाल म्हणाले.

शिक्षण, नवनिर्मिती आणि सांस्कृतिक विकासात महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या व्यावसायिक जीवन प्रवासाला सुरुवात करत असताना, या राज्याचा वारसा पुढे नेण्यासाठी त्याच्या विकासात आणि समृद्धीसाठी हातभार लावावा, अशी अपेक्षाही राज्यपालांनी व्यक्त केली.

भारत जगातील सर्वात तरुण राष्ट्र म्हणून उदयास आला असून ही आपली सर्वात मोठी ताकद आहे. ही ताकद जागतिक नेता बनण्याची आपली क्षमता वाढविते. तथापि, देशासमोर दारिद्र्य, बेरोजगारी, ऊर्जा, पाणीटंचाई आणि सुरक्षितता अशी आव्हानेही असून त्यावर मात करण्यासाठी नावीन्य, संशोधन, उद्यमशीलता आदी सर्वांचा वापर करणे आवश्यक आहे.

देशांतर्गत समस्यांवर लक्ष केंद्रित करताना आपण केवळ देशाचे नव्हे तर जगाचे नागरिक असल्याचे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आपल्या भविष्यातील पिढ्यांसाठी जगाचे नागरिक या नात्याने जागतिक स्तरावर भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कार्य करणे अत्यावश्यक आहे.

यावेळी डॉ.प्रमोद चौधरी म्हणाले, सीओईपीला एक दीर्घ परंपरा लाभली असून विशिष्ट नितीमूल्यांवर विद्यार्थी घडवले जातात. तांत्रिक कुशलतेसोबतच येथे शिकणारा विद्यार्थी भारताचा उद्याचा जबाबदार नागरिकही होईल, यादृष्टीने त्याची जडण-घडण केली जाते. समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सीओईपीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर योगदान दिले आहे.

यावेळी कुलगुरू डॉ. सुनिल भिरूड यांनी सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या भविष्यकालीन उपक्रमांबाबत माहिती देऊन विद्यापीठ अहवालाचे वाचन केले. माहिती देताना ते म्हणाले, आजच्या पदवीदान समारंभात विद्यापीठातील २४६ पदव्युत्तर विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येत असून विविध विद्याशाखांमध्ये प्रथम क्रमांकाची कामगिरी करणाऱ्या १२ विद्यार्थ्यांना रँक प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात येत आहे. याशिवाय ७७७ पदवीधर विद्यार्थ्यांना उत्तीर्ण प्रमाणपत्रे, उत्कृष्ट कामगिरीसाठी ९ पदवीधर विद्यार्थांना सुवर्ण पदके प्रदान करण्यात येत आहेत.

कार्यक्रमास विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.

0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here