धूळगावसह राजापूर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कामांना गती द्यावी – मंत्री छगन भुजबळ यांचे निर्देश

नाशिक, दिनांक : 29 ऑगस्ट 2024 (जिमाका वृत्तसेवा) : येवला तालुक्यातील धूळगावसह राजापूर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना परिसरातील गावांसाठी अत्यंत महत्वाची आहे.  त्यामुळे संबंधित यंत्रणांनी समन्वय साधत योजनेची कामे तातडीने मार्गी लावावीत, असे निर्देश अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे दिले.

राजापूरसह ४१ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना व धुळगावसह १६ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा आढवा मंत्री श्री. भुजबळ यांनी येवला येथील संपर्क कार्यालयात घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

धूळगावसह राजापूर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना

राजापूरसह ४१ गाव पाणी पुरवठा योजनेतील जलकुंभ, जलशुद्धीकरण केंद्र, जलवाहिनी, वीज पंपाच्या कामांना तातडीने गती देत लवकरात लवकर पाणीपुरवठा होईल, असे नियोजन करावे. वीज वितरण कंपनीने वीज तारांच्या स्थलांतरासह नवीन जोडणीच्या कामांचे आठवडाभरात नियोजन करून उर्वरित कामे मार्गी लावावीत. तसेच या दोन्ही योजनांची कामे विहित कालावधीत पूर्ण होतील याची दक्षता घ्यावी, अशाही सूचना मंत्री श्री. भुजबळ यांनी दिल्या. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या योजनांच्या सद्यस्थितीची माहिती दिली. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते अंबादास बनकर, वसंत पवार, साहेबराव मढवई, ज्ञानेश्वर शेवाळे, डॉ.मोहन शेलार, प्रा.ज्ञानेश्वर दराडे,भगवान ठोंबरे, भूषण लाघवे यांच्यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, वीज वितरण कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून शिवसृष्टी प्रकल्पाच्या कामाची पाहणी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याच्या संकल्पनेवर आधारित भव्य दिव्य असा शिवसृष्टी प्रकल्प येवला शहरांमध्ये साकारण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या कामाची पाहणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री श्री. भुजबळ यांनी आज केली. यावेळी अंतिम टप्प्यात असलेल्या शिवसृष्टी प्रकल्पाचे काम नियोजित वेळेत पूर्ण करावे असे सूचना यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

०००००