प्रवासी सुविधांनीयुक्त नवीन सातारा बस स्थानकाची निर्मिती करावी – उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई

0
5
Virendra Dhuri DGIPR,Mantralaya

मुंबई, दि. २९ : सातारा शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाची वास्तू जुनी झाली असून येथील प्रवासी सुविधांवरही मर्यादा येत आहेत. सातारा शहरातील बस स्थानकाची वास्तू पूर्णपणे पाडून त्या ठिकाणी नवीन बस स्थानकाची निर्मिती करावी. यामध्ये प्रवासी सुविधांना अधिक प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देश उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी दिले.

मंत्रालयीन दालनात आज सातारा बस स्थानक दुरूस्ती व सुशोभीकरण आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री. देसाई बोलत होते. बैठकीस महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, महामंडळाचे महाव्यवस्थापक (बांधकाम) दिनेश महाजन उपस्थित होते.

सातारा येथील संपूर्ण बसस्थानकाचा कायापालट करण्याचे निर्देश देताना राज्य उत्पादन शुल्क मंत्री श्री. देसाई म्हणाले की, बस स्थानक निर्मितीचा प्रस्ताव सादर करावा. बस स्थानकाचा चांगला आराखडा अंतिम करावा. बस स्थानकामध्ये प्रवासी सुविधांना प्राधान्य देण्यात यावे. बांधकाम एकाच टप्प्यात शक्य नसल्यास दोन टप्प्यात करावे. बस स्थानकाचा दर्शनी भाग आकर्षक करून प्लॅटफॉर्मची संख्या वाढविण्यात यावी, प्रवाशांसाठी स्वच्छतागृह, चालक, वाहक यांच्यासाठी निवासाची दर्जेदार व्यवस्था करण्यात यावी. पाटण येथील बस स्थानकाचे काम पूर्ण करावे. बस स्थानकावर चार्जिंग स्टेशनची व्यवस्था करण्यात यावी. सातारा जिल्ह्यातील मरळी, हिरवडी व तराळी बस स्थानकांची कामेही गतीने पूर्ण करण्याच्या सूचनाही मंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.

००००

नीलेश तायडे/विसंअ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here