महाराष्ट्र आणि गुजरातमधील लोककलांचे आदान-प्रदान

0
15

मुंबई, दि. 01 : सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमी द्वारा लोकायन सांस्कृतिक संस्था, मुंबई यांच्या सहकार्याने ‘गप्पा लोककलेच्या, महाराष्ट्र आणि गुजरातच्या’ (वातो लोककलानी, महाराष्ट्र अने गुजरातनी) हा लोककलांचा अभ्यासात्मक आणि संगीतमय कार्यक्रम दि. ३१ ऑगस्ट २०२४ रोजी, सायंकाळी ६ वाजता, समाज कल्याण हॉल, दहिसर (पूर्व) येथे पार पडला.

सदर कार्यक्रमात भागवत परिवाराचे वीरेंद्र याज्ञिक, करुणाशंकर ओझा, भागवत कथाकार मीनाबेन जोशी, प्रा. सुरेंद्र तन्ना, महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष स्नेहल मुजुमदार, तसेच लोकायन संस्थेचे योगेश्वर लोळगे उपस्थित होते. सोबत डॉ. मोनिका ठक्कर लिखित ‘भुलजा भुलाबाई के लोकगीतों का उद्देश और अर्थ’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

महाराष्ट्रातील तसेच गुजरातमधील लोककला प्रकारांविषयी डॉ. मोनिका ठक्कर यांनी महाराष्ट्र आणि गुजरात मधील भाषा, संस्कृती, कला यांचा संबंध किती जवळचा हे स्पष्ट केले. गुजरातमधील काही लोकगीतांमागील करुण लोककथांबद्दल,  महाराष्ट्रातील लोककला व त्यांचे प्रकार याबद्दल विस्तृत माहिती देत लोककला, लोकसंस्कृती आणि लोकसाहित्य या विषयांवरील विविध पैलूंवर प्रकाश टाकला.

उपस्थित मान्यवरांनी  हा कार्यक्रम आपल्या लोककला व लोकसंस्कृती बद्दल जागृती निर्माण व्हावी, याचा प्रचार-प्रसार व्हावा या दृष्टिकोनातून संपूर्ण महाराष्ट्रात व्हावा, असे मत व्यक्त केले. महाराष्ट्रातील लोकगीतांचे सादरीकरण डॉ. शिवाजी वाघमारे आणि वृंद तर गुजरातच्या लोकगीतांचे सादरीकरण कु. धानी चारण यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना डॉ. मोनिका ठक्कर यांची होती.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here