अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर

0
16

शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देणार  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लातूर, दि. ०४ : लातूर जिल्ह्यात २ सप्टेंबर रोजी ३२ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले. यावेळी त्यांनी उदगीर तालुक्यातील हेर आणि लोहारा शिवारातील पीक नुकसानीची पाहणी केली, तसेच शेतकऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेतली.

शेतकऱ्यांना मदत करताना नियम, निकष न पाहता एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवून जास्तीत जास्त नुकसान भरपाई दिली जाईल. राज्य शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून यावेळी झालेल्या नुकसानीच्या काळातही शेतकऱ्यांना पूर्ण ताकदीने मदत केली जाईल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले. तसेच अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेगाने करून शेतकऱ्यांना लवकरात नुसकान भरपाई देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्यासह माजी आमदार गोविंद केंद्रे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर यावेळी उपस्थित होते.

२ सप्टेंबर रोजी उदगीर, जळकोट तालुक्यातील सर्व महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना तातडीने नुकसान भरपाईबाबत आश्वस्त केले.

मराठवाड्यात अतिवृष्टी झाल्यानंतर लगेचच विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. लातूर जिल्ह्यातही अतिवृष्टीने सोयाबीनसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे आज प्रत्यक्ष पाहणीमध्ये दिसून आले. सोयाबीन पिकामध्ये अजूनही पाणी साचलेले दिसत आहे. यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्यात येईल.

अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांना लवकरात लवकर देण्यात येईल. पंचनाम्याचे अहवाल येताच नुकसानभरपाईबाबत पुढील कार्यवाही तातडीने केली जाईल, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

००००

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here