उद्योगासाठीच्या तांत्रिक प्रशिक्षणासाठी २० सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

0
12

मुंबई, दि.४ : उद्योगांसाठी आवश्यक असलेले तांत्रिक प्रशिक्षण देणाऱ्या इंडो जर्मन टूल रूम (आय.जी.टी.आर.)(छत्रपती संभाजीनगर) या लघु सूक्ष्म आणि मध्यम मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या भारत सरकारच्या प्रशिक्षण संस्थेशी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) पुणे या संस्थेने सामंजस्य करार केला आहे. यानुसार उद्योगासाठीच्या तांत्रिक  प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना सहाय्य केले जाणार आहे. तसेच याअंतर्गत ७० हजार रुपयांपर्यंतचे तांत्रिक प्रशिक्षण मोफत मिळणार आहे. इच्छुक पात्रताधारक उमेदवारांनी या प्रशिक्षणासाठी २० सप्टेंबर २०२४ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन अमृतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले आहे.

या योजनेची सविस्तर माहिती www.mahaamrut.org.in किंवा  https://www.igtr-aur.org/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची मागणी लक्षात घेऊन, रोजगार व स्वयंरोजगाराच्या अनेक संधी देणाऱ्या अमृत संस्था प्रायोजित इंडो जर्मन टूल रूम (छत्रपती संभाजीनगर) संस्थेच्या विविध तांत्रिक अभ्यासक्रमांचे नि:शुल्क प्रशिक्षण ‘अमृत’ च्या लक्षित गटातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी घ्यावे. अधिक माहितीसाठी दीपक जगताप ९६७३७१४१७०, अनिकेत देशमुख ९६६५१६२४४१, आनंद निकाळजे ९३२५४८७०७३ किंवा अमृत कार्यालय ९७३०१५१४५० या क्रमांकावर संपर्क साधावा.

या योजनेंतर्गत १५ निवासी प्रशिक्षण अभ्यासक्रम तसेच ३० अनिवासी प्रशिक्षण अभ्यासक्रम हे आय.जी.टी.आर. (छत्रपती संभाजीनगर) संस्थेच्या छत्रपती संभाजीनगर, वाळूंज, पुणे, नागपूर, कोल्हापूर या उपकेंद्रात दिले जाईल.

ही योजना खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग/संस्था/महामंडळामार्फत योजनांचा लाभ मिळत नाही, अशा खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील १८ ते ४० वयोगटातील पात्रताधारक युवक, युवतीसाठी आहे. १० वी उत्तीर्ण तसेच आय.टी.आय., पदवीका, पदवी उत्तीर्ण किंवा अंतिम वर्षात शिकत असलेले उमेदवार या योजनेसाठी अर्ज करु शकतात. इच्छूक उमेदवाराचा महाराष्ट्र राज्यात अधिवास असणे अनिवार्य आहे.पात्रता निकषांची पूर्तता करत योजनेचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांना ६ ते १२ महिन्यांच्या कालावधीचे तांत्रिक अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण मिळेल. या प्रशिक्षणाचे संपूर्ण शुल्क ‘अमृत’ संस्था भरणार आहे. त्याचप्रमाणे निवासी अभ्यासक्रमासाठी भोजन आणि निवासाचा काही खर्च देखील ‘अमृत’ द्वारे अदा करण्यात येणार आहे.

या योजनेद्वारा ‘अमृत’ चे लक्षित गटातील उमेदवारांना खूप चांगली संधी उपलब्ध करून देण्यात आलेली असून विविध आकर्षक आणि उत्कृष्ट अशा निवडक IGTR कोर्सेस चे प्रशिक्षण शुल्क, निवास आणि भोजनाचा खर्च त्याचप्रमाणे हा कोर्स उत्तीर्ण झाल्यानंतर नोकरीची संधी देखील उपलब्ध होणार आहे.

0000

शैलजा पाटील/विसंअ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here