कामगारांसाठी राज्यात ३०४ सेतू केंद्र – कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे

सेतू केंद्रांचे ऑनलाईन उद्घाटन

मुंबई, दि. 5 : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने एक नवीन प्रकल्प राबविण्यात आला आहे. तालुक्याच्या ठिकाणी जे बांधकाम कामगार आहेत त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन नोंदणी करावी लागते. रोजंदारी कामगार असल्याने त्यांचा तो दिवस खाडा पडतो. त्यामुळे तालुक्याच्या  ठिकाणी ‘तालुका कामगार सुविधा केंद्र’ अर्थात सेतू केंद्र स्थापन करण्यात आले आहे. आज राज्यात 358 सेतू केंद्र चालू करावयाचे असून यातील 304 सेतू केंद्राचे आज ऑनलाईन उद्घाटन केले असल्याची माहिती कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी दिली.

महाराष्ट्र महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सेतू केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, आमदार संजय राठोड, मुख्य  सचिव श्रीमती सुजाता सौनिक, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक कुंभार उपस्थित होते.

कामगार मंत्री डॉ.खाडे म्हणाले की, कामगारांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्या, तर त्यांनी या हक्काच्या सेतूमध्ये येऊन नोंदणी किंवा अन्य सोयी सुविधा देण्यासाठी हे सेतू केंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याचबरोबर कामगारांना ज्या सुविधा देण्यात येतात, त्याबाबतची पुस्तिका तयार करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, याचीही माहिती देण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.

मंत्री डॉ.खाडे पुढे म्हणाले की,  बॉयलर इंडियाचे एक मोठे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन नवी मुंबईतील वाशी येथे 25,26 आणि 27 सप्टेंबर 2024 रोजी भरविण्यात येणार आहे. यामध्ये बॉयलरचे वेगवेगळे  प्रकार, गुणवत्तेसोबतच परदेशातील बायलर पाहायला मिळेल व त्याबाबतचे मार्गदर्शन सुद्धा मिळणार आहे. या प्रदर्शनाकरिता देशातील मोठ्या बॉयलरधारक उद्योगांना आमंत्रित केले असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री डॉ.खाडे यांनी सांगितले की, कामगार न्यायालयातील न्यायाधीशांच्या वेतनाचा प्रश्न होता. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयांचे तंतोतत पालन करून त्यांच्या वेतनाचा प्रश्न मंत्रिमंडळासमोर मांडण्यात आला आणि तो मंजूर झाला असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

000

संजय ओरके/विसंअ