आपत्ती व्यवस्थापनाबाबत सर्वांनी दक्ष राहावे – विभागीय आयुक्त दिलीप गावडे

0
7

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने ‘दक्ष’ आपत्ती व्यवस्थापन परिषदेला उस्फुर्त प्रतिसाद

आपत्ती काळातील उल्लेखनीय कार्याचा गौरव

छत्रपती संभाजीनगर दि.5: नैसर्गिक आपत्तीच्या कालावधीत परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपापसात योग्य समन्वय, संपर्क, संवाद महत्त्वाचा आहे तसेच आपत्ती व्यवस्थापनाबाबत सर्वांनी दक्ष राहावे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज केले. आपत्ती व्यवस्थापनात स्थानिक नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ऑडिटोरियम हॉल येथे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने आयोजित ‘दक्ष’ आपत्ती व्यवस्थापन परिषद २०२४ च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विनय राठोड, छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस उपआयुक्त नितीन बगाटे, उपायुक्त जगदिश मिनीयार, निवासी उपजिल्हाधिकारी  विनोद खिरोळकर व उपायुक्त नयना बोंदार्डे उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्री. गावडे म्हणाले, आपत्तीच्या वेळी तत्परतेने योग्य निर्णय घेत निर्णयाची अंमलबजावणी केली पाहीजे. आपत्तींना कशाप्रकारे तोंड देता येईल, प्रशासकीय यंत्रणा कसे कार्य करतात, त्यासाठी प्रशासनाला कशा पद्धतीने सहकार्य अपेक्षित आहे, याची माहिती आणि जाणीव परस्परांना असणे आवश्यक आहे. यासाठीच या विषयातील मान्यवर व तज्ज्ञांसह आपल्याशी  थेट संवाद होत आहे. आपत्ती व्यवस्थापनाबाबतचे हे  प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

अचानक येणाऱ्या आपत्तीच्या काळात समयसूचकता अत्यंत महत्वाची आहे. अत्यंत बारकाईने नियोजन करुन संवादद्वारे परिस्थितीनुसार निर्णय घेणे महत्त्वाचे असते. अशावेळी स्थानिक नागरिक आणि प्रशाकीय यंत्रणा  यांनी समन्वयाने काम करावे. मदत व बचावकार्यात स्थानिक नागरिकांचा सहभाग वाढवावा. आजच्या या कार्यशाळेतून प्रशिक्षण घेतल्यानंतर आपल्या भागात आपत्तीच्या वेळी आपण दक्ष असायला हवे, असेही श्री गावडे म्हणाले.

लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे म्हणाल्या, आपत्तीच्या कालावधीत आपत्तीपूर्व व आपत्तीच्या वेळी नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. आपत्तीमध्ये सुरक्षित राहण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाविषयी सर्वांना  माहिती असणे आवश्यक आहे. आपण जनसामान्यपर्यंत आपत्ती व्यवस्थापनाबाबत व्यापक जनजागृती करणे आवश्यक असून प्रत्येकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले, आपत्तीच्या काळात आपण सदैव दक्ष असणे गरजेचे आहे. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी लक्ष देवून दक्ष रहावे लागते. अचानक येणाऱ्या आपत्तीच्या वेळी काय करावे तसेच आपल्या घरात प्राथमिक सुविधा असणे आवश्यक आहेत. नैसर्गिक आपत्ती येवू नये मात्र आलीच तर त्याला कसे सामोरे जावे यासाठी आजचे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. प्रशिक्षणात सहभागी  प्रत्येकाने आपत्तीच्या वेळी दक्ष रहावे, असेही ते म्हणाले.

पोलीस उपआयुक्त नितीन बगाटे यांनी चंद्रपूर जिल्हयात जंगली भागात लागलेली आग व छत्रपती संभाजीनगर येथील गॅस गळती या आपत्तीच्या वेळी प्रशासन व नागरिकांचा सहभाग याबाबतचे अनुभव सांगितले.

आपत्ती व्यवस्थापन आणि लाइटनिंग सुरक्षा आणि संरक्षण उपायांमध्ये तरुणांची भूमिका या विषयावर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, उपकेंद्र लातूर येथील सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रमोद पाटील यांनी मार्गदर्शन केले.

सार्वजनिक आरोग्य आपत्कालीन व्यवस्थापन आणि आंतर विभागीय समन्वय याबाबत घाटी रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथील सहयोगी प्राध्यापक डॉ. राजेंद्र अंकुशे यांनी मार्गदर्शन केले.

दुपारच्या सत्रात उपस्थितांबरोबर चर्चा -प्रश्न झाले.  यामध्ये डॉ. प्रमोद पाटील डॉ. राजेंद्र अंकुशे श्री. अनिल नलावडे यांनी मार्गदर्शन केले.

परिषदेत आपदा मित्र, बचाव कार्यात सहभागी होणाऱ्या विविध सेवाभावी संस्था, होतकरू नागरिक, गिर्यारोहक संघ, सरपंच, युवक-युवती, आपत्ती व्यवस्थापन अभ्यासक्रमास प्रविष्ठ असणारे महाविद्यालयीन, विद्यापीठातील युवक तसेच इतर पदाधिकारी व बचाव कार्य करणाऱ्या यंत्रणांमधील अधिकारी, कर्मचारी यांनी सहभाग घेतला.

कार्यशाळेचे संयोजन निवासी उपजिल्हाधिकारी  विनोद खिरोळकर व उपायुक्त नयना बोंदार्डे यांनी केले. परिषदेला विभागातील आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी, पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आपत्ती काळातील उल्लेखनीय कार्याचा गौरव

विभागातील आठही  जिल्ह्यात आपत्ती काळात केलेल्या कार्याचा विशेष गौरव करण्यात आला. यामध्ये जिल्हा व्यवस्थापन अधिकारी लातूर डॉ. साकेब अब्दुल हकीम उस्मानी, जिल्हा व्यवस्थापन अधिकारी नांदेड किशोर अशोकराव कुऱ्हे, जिल्हा व्यवस्थापन अधिकारी जालना दीपक दगडूअप्पा काजळकर, जिल्हा व्यवस्थापन अधिकारी परभणी पवन प्रकाश खांडके, जिल्हा व्यवस्थापन अधिकारी धाराशिव वैषाली विनीत तेलोरे-गायकवाड, जिल्हा व्यवस्थापन अधिकारी हिंगोली रोहिदास शिवाजीराव कंजे, जिल्हा व्यवस्थापन अधिकारी छत्रपती संभाजीनगर मारूती अर्जून मस्के, विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक छत्रपती संभाजीनगर चंद्रकात दौलत बनकर यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.

उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व स्वयंसेवी संस्था यांचाही गौरव

आपत्ती व्यवस्थापनामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व स्वयंसेवी संस्था यांचाही यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये शमशेर अली खान शेर अली खान पठाण ता.कळमनुरी, जि.बीड यांनी नदी नाल्यांना पूर आल्यानंतर त्यामध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे कार्य ते करतात तसेच पाण्यात बुडत असताना 25-30 लोकांचे प्राण वाचविण्याचे काम त्यांनी केले. तसेच पाण्यात बुडालेले 32 वर्षात एकूण 173 लोकांचे मृतदेह पाण्याबाहेर त्यांनी काढले. कोव्हिड-19 कालावधीत 35 मृतदेहांचा अत्यंविधी त्यांनी केला.

सोनाजी खिल्लारे, फायरमन, नगरपरिषद पूर्णा जि.परभणी यांनी 2021 परभणी जिल्ह्यातील मौजे बलसा या ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमध्ये शेतात पुराच्या पाण्यात अडकून बसलेल्या एकूण 6 लोकांना बोटच्या सहाय्याने पुराच्या पाण्यातून सुरक्षित रेस्क्यू केले.

विशाल आल्टे, अग्निशमन अधिकारी उदगीर, जि.लातूर यांनी मागील तीन वर्षात 100 पेक्षा जास्त रेस्क्यू ऑपरेशन जिल्हा व आवश्यकतेनुसार शेजारच्या जिल्ह्यात शोध व बचाव कार्य केले. सांगली मिरज पुरात 10 दिवस लातूरच्या तैनात पथकाचे नेतृत्व करून उत्कृष्ट कामगिरी बजावली.

रेणुका बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, छत्रपती संभाजीनगर यांनी कोव्हिड-19 कालावधीमध्ये एकल महिला व अनाथ मुले यांच्यासाठी कार्य केले. यात त्यांनी महिला व बालविकास विभागासोबत ज्या मुलांचे आई वडील कोव्हिड-19 मुळे मृत्यु पावलेले आहेत अशांची यादी करून त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला.

दीपक राजेंद्र उदावंत संगणक ऑपरेटर, जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर हे दि.01 फेब्रुवारी, 2024 रोजी सिडको परिसरात गॅस टँकर अपघात होवून मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाली तेव्हा सदर ठिकाणी जीवाची परवा न करता घटना आटोक्यात येईपर्यंत घटनास्थळावर उपस्थित होते.

एम.वाय.घुगे, उपअग्निशमन अधिकारी, मनपा, छत्रपती संभाजीनगर यांनी चिमनापूर वाडी येथे के.टी.बंदरा येथे पडलेल्या मुलीला घटनास्थळी जाऊन पाच मिनीटाच्या आत जाऊन संबंधित मुलीला काढून हर्सूल पोलिसांच्या स्वाधीन केले. तसेच दि.02 सप्टेंबर, 2024 रोजी मौजे हमदाबाद शिवारातील विहिरीत एक मुलगा बुडाला होता. दहा मिनिटांच्या आत सदरील मुलाला शोधून विहिरीतून बाहेर काढले व पिशोर पोलिसांच्या स्वाधीन केले. श्री.घुगे हे शोध व बचाव कार्यामध्ये नेहमी तत्पर असतात.

श्री.माधव एकनाथ पानपट्टे, अग्निशमन अधिकारी, जालन शहर महानगर पालिका यांनी पाठोदा मंठा जि.जालना येथे पाठोदा शिवारातील तलावातून पाणी गावात आले. गावातून वाहणाऱ्या नाल्यास पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने गावातील पूर्व बाजूस असणाऱ्या घरात पाणी शिरले त्यामुळे पाणी जास्त प्रमाणात असल्याने 4 ते 10 फुट पाण्याची पातळी होती. त्यामुळे लोकांच्या जीवास धोका निर्माण झाला होता. सदर घटनेवर श्री.पानपट्टे यांनी आपल्या टीम सह दि.01 सप्टेंबर रोजी रात्री 11.30 पासून गावातील लोकांना रेस्क्यु करून सुरक्षित स्थलांतर करण्याची उल्लेखनिय कामगिरी केली आहे.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here