हिंदकेसरी पैलवान मारूती माने स्मारकातील अपूर्ण कामे सर्वोच्च प्राधान्याने पूर्ण करावीत – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

0
18

हिंदकेसरी पैलवान मारूती माने स्मारक समितीच्या बैठकीत दिल्या सूचना; स्मारक हस्तांतरणाची कार्यवाही महिनाभरात पूर्ण करण्याचे निर्देश

सांगली, दि. 10 (जि. मा. का.) : आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू हिंदकेसरी पैलवान मारूती माने यांच्या कवठेपिरान येथील स्मारकातील अपूर्ण कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. ही कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावीत, अशा सूचना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे दिल्या.

कवठेपिरान (ता. मिरज) येथे बांधण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू हिंदकेसरी पैलवान मारूती माने स्मारक समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नंदिनी घाणेकर, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर, माजी आमदार दिनकर पाटील, निशिकांत पाटील, नामदेवराव मोहिते, विठ्ठल पाटील, भीमराव माने, रघुनाथ दिंडे, वास्तुविशारद प्रमोद चौगुले यांच्यासह स्मारक समितीचे सदस्य उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, हिंदकेसरी पैलवान मारूती माने स्मारकातील अपूर्ण कामे सर्वोच्च प्राधान्याने करावीत. कामाच्या दर्जामध्ये कोणतीही तडजोड केली जावू नये. हिंदकेसरी पैलवान मारूती माने यांच्या पुतळ्यातील त्रृटी दूर कराव्यात. सर्व कामे महिनाभरात पूर्ण करून स्मारक हस्तांतरणाची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.

यावेळी स्मारक समिती सदस्यांनी मौलिक सूचना मांडल्या. तसेच, स्मारकात हिंदकेसरी पैलवान मारूती माने यांचा हुबेहुब पुतळा उभारावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

क्रांतीकुमार मिरजकर यांनी स्मारकासंदर्भात केलेल्या कार्यवाहीबाबत सादरीकरण केले. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयान्वये हिंदकेसरी पैलवान मारूती माने यांच्या कवठे पिरान या मूळ गावी स्मारक बांधण्यास प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. यामध्ये मुख्य इमारतीसह प्रवेश गॅलरी, हिंदकेसरी पैलवान मारूती माने यांचा पुतळा, म्युझिअम, रेस्टलिंग प्रॅक्टिस हॉल, स्वच्छता गृह, अंतर्गत रस्ते, कुंपण भिंत, प्रवेशद्वार आदि कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. स्मारक बांधकामासाठी 15 सदस्यांची समिती गठित करण्यात आली आहे. स्मारकाच्या बांधकामासाठी जवळपास 4 कोटी 90 लाख रुपयांपैकी जवळपास 4 कोटी 9 लाख रूपये निधी प्राप्त असून मुख्य इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात 

सामाजिक न्याय विभागांतर्गत जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. वसतिगृह निरीक्षण समितीच्या सदस्यांनी वसतिगृहांना भेटी देऊन देण्यात आलेल्या सुविधांचा आढावा घ्यावा, अशा सूचना कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे दिल्या.

जिल्हास्तरीय वसतिगृह निरीक्षण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नंदिनी घाणेकर, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर, जिल्हा समाजकल्याण अधिकारी बाळासाहेब कामत, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड आदि उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, सांगली जिल्ह्यात एकूण 21 वसतिगृहे असून, त्यापैकी 10 मुलींची व 11 मुलांची वसतिगृहे आहेत. या वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी पूरक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. वसतिगृहासाठी सामाजिक न्याय विभागाच्या स्वमालकीच्या इमारतींसाठी प्रयत्न करावेत. जिल्ह्यात 125 वी जयंती मुलींचे शासकीय वसतिगृह, सांगली व गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह अशा दोन इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. दोन्ही वसतिगृहात पाणीपुरवठा सुरू करून इमारत हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच, शासकीय वसतिगृहांच्या अत्यावश्यक दुरूस्तीचे काम तातडीने पूर्ण करावे. वसतिगृह निरीक्षण समितीच्या सदस्यांनी वसतिगृहांना भेटी देऊन, विद्यार्थ्यांशी संवाद साधावा. त्यांच्या अडीअडचणी समजून घ्याव्यात, असे त्यांनी यावेळी सूचित केले.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचाही घेतला आढावा

यावेळी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांचा आढावा घेतला. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 (बॅच 1) संशोधन व विकास अंतर्गत सांगली जिल्ह्यातील एकूण 162.30 किलोमीटरच्या 45 रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. या रस्त्यांची कामे सुरू होण्यासाठी आवश्यक प्रक्रिया महिनाभरात पूर्ण करण्याचे आदेश यावेळी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले. या रस्त्यांच्या कामासाठी एकूण 249.11 कोटींच्या रकमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

पुनर्वसनाचा प्रलंबित प्रश्न संवेदनशीलतेने हाताळून बाधित प्रकल्पग्रस्तांना न्याय द्यावा 

चांदोली अभयारण्य व वारणा प्रकल्प बाधित प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रलंबित प्रश्न प्रशासनाने संवेदनशीलतेने हाताळून प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याची भूमिका ठेवावी, अशा सूचना कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे दिल्या.

जिल्ह्यातील चांदोली अभयारण्य व वारणा प्रकल्प बाधित प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनप्रश्नी आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नंदिनी घाणेकर, अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, जिल्हा पुनर्वसन अधिकारी रघुनाथ पोटे, उपवनरंसक्षक नीता कट्टे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता डी. डी. शिंदे, निशिकांत पाटील, सत्यजीत देशमुख यांच्यासह प्रकल्पग्रस्ताचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्रालयात मदत व पुनर्वसन मंत्री व वनमंत्री यांच्यासमवेत संयुक्त बैठक आयोजित करून चांदोली अभयारण्य व वारणा प्रकल्प बाधित प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रलंबित प्रश्नासाठी पाठपुरावा करू, असे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी यावेळी सांगितले. मात्र, त्याचवेळी महसूल, जलसंपदा आणि वन विभागाने समन्वयाने काम करून जास्तीत जास्त प्रकरणे मार्गी लावावीत. त्यासाठी कँप आयोजित करावेत, असे त्यांनी यावेळी सूचित केले.

यावेळी प्रकल्पग्रस्तांनी त्यांचे प्रश्न मांडून पुनर्वसनाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी  जिल्हा पुनर्वसन अधिकारी व वनविभाग यांच्या नावे असलेल्या जमिनी प्रकल्पग्रस्तांना दाखवण्यात याव्या व पसंतीप्रमाणे तात्काळ वाटप करणे, आष्टा येथील वनविभाग यांच्या नावे असलेली जमीन तात्पुरत्या स्वरूपात कसण्यासाठी प्रकल्पग्रस्तांना देणे, निर्वाह भत्ता / 65 टक्के रक्कमेवरील व्याज किंवा इतर अनुदान तात्काळ वाटप करणे, डॉ. शामा प्रसाद मुखर्जी जनवन योजनेचा लाभ देणे आदी विषयांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here