समाजाच्या कल्याणासाठी राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून धोरणात्मक निर्णय घेणे शक्य – विधानपरिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे

एमआयटी डब्ल्यूपीयूत मिटसॉगच्या २० व्या बॅचचा शुभारंभ

पुणे, दि.१३ : आजच्या पिढीने शासन, प्रशासन, न्याय संस्था आदी समजावून घेणे आवश्यक आहे. समाजाचे कल्याण साधण्याच्यादृष्टीने धोरणात्मक निर्णय घेण्यासह त्यात बदल करण्यासाठी राजकीय क्षेत्राचा उपयोग होतो, असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या ‘एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट’ (मिटसॉग) च्यावतीने आयोजित ‘मास्टर्स इन पॉलिटिकल लीडरशीप अँड गव्हर्नमेंट’(एमपीजी) २० व्या तुकडीच्या शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी पंजाबच्या विधानसभेचे सभापती कुलतार सिंह संधवान, राजस्थान विधानसभेचे माजी सभापती डॉ. सी. पी.जोशी, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष राहुल कराड, कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस, मिटसॉगचे संचालक डॉ. के. गिरीसन, प्रा. डॉ. परिमल माया सुधाकर व श्रीधर पब्बीशेट्टी आदी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना शिक्षण व्यवस्था, सांस्कृतिक बदल, मानवाधिकार आदींचे ज्ञान आवश्यक आहे. त्यांनी जनतेपासून ज्ञान मिळवावे, जनतेचे म्हणणे ऐकण्याची सवय ठेवावी तसेच वैज्ञानिक विचार बाळगावेत. राजकीय क्षेत्रात आल्यानंतर संसदीय कामकाज, वैयक्तिक, सामाजिक, आर्थिक आणि जीवनासंदर्भातील अधिकार व आत्मविश्वास मिळतो. देशात आजही जाती आणि वर्ण भेद असून ते मिटविण्यासाठी युवकांनी कार्य करावे. बदलत्या परिस्थितीमुळे खाजगी आणि सार्वजनिक जीवन यात भेद राहिलेला नाही याचेही भान ठेवावे.

श्री. संधवान म्हणाले, ‘सेवा परमोधर्म’ हे सूत्र लक्षात ठेऊन राजकीय क्षेत्रात उतरावे. जनतेच्या सेवेतूनच सामाजिक समस्या सोडविता येतात. समाजावर राजकारणाचा सर्वात जास्त प्रभाव पडतो. या क्षेत्रात येताना मानव सेवा निःस्वार्थ भावनेने करावी. समाजातील प्रत्येक व्यक्तीचा विकास होणे गरजेचे आहे. देशातील संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये कायदे मंजूर होताना त्यावर व्यापक आणि अभ्यासपूर्ण चर्चा होण्याच्या दृष्टीने नवीन पिढीचे आमदार आणि खासदार निर्माण व्हावेत, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

डॉ.जोशी म्हणाले, देशात उच्च शिक्षण जरी गुणवत्तापूर्ण असले तरी प्राथमिक शिक्षणात मोठ्या सुधारणेची गरज आहे. विषम समाजाला एकत्रित आणण्यासाठी राजकारणातील व्यक्तींचे काम आहे. त्यासाठी युवकांमधील कौशल्यांचा मोठ्या प्रमाणात वापर व्हावा. स्वातंत्र्यपूर्व काळातील नेतृत्व परदेशातून उच्च शिक्षण घेऊन आले होते. त्यामुळे त्यांना जागतिक राजकारणातील प्रवाह, मूल्ये यांची जाण होती. हे पाहता देशात राजकीय क्षेत्रात योग्य प्रशिक्षणाची गरज आहे, असेही ते म्हणाले.

प्रा.डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, भारतीय संस्कृती, तत्वज्ञान आणि परंपरेचे पालन करून मानव सेवेला महत्त्व द्यावे. ‘वसुधैव कुटुंबकुम्’ची संकल्पना राबविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपण देशाचे सेवक आहोत, अशी भावना ठेऊन प्रत्येकाने कार्य करावे, असेही ते म्हणाले.

याप्रसंगी श्री. राहुल कराड, डॉ.चिटणीस यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. सुधाकर यांनी मिटसॉगच्या स्थापनेची पार्श्वभूमी सांगितली. तसेच विद्यार्थी संस्कृती ढोलमा आणि ध्रुव सावजी यांनी विचार मांडले.

यावेळी विद्यापीठाच्यावतीने ‘नॅशनल लेजिस्लेटिव्ह कॉन्फरन्स’च्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
0000