लाडक्या बहिणीमुळे कुटुंबाला मोठा आर्थिक आधार 

0
175

लाभार्थी म्हणतात : गरीबांसाठी दिड हजार महिना आर्थिक सक्षमीकरणाचा पाया

धाराशिव (परंडा) दि.14: राज्य शासनाचा महिला सशक्ती करणावर भर असून महिलांना सशक्त, आत्मनिर्भर होण्यासाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहे. त्यातच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण  योजनेअंतर्गत मिळालेल्या रक्कमेमुळे गरीब परिस्थिती असलेल्या महिलांच्या कुटुंबाला मोठा आर्थिक आधार मिळाल्याची भावना लाभार्थी महिलांनी व्यक्त केल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री तानाजी  सावंत यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचे आयोजन  धाराशिव जिल्ह्यातील परांडा शहरातील कोटला मैदान येथे करण्यात आले होते.यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी  बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनी कार्यक्रमाच्या पूर्व व पश्चात काळात अतिशय भावनिक प्रतिक्रीया दिल्या. दीड हजाराचे महत्त्व गरीबांनाच माहिती, असा सगळ्यांचा सूर होता.

लाडक्या भावाचे आभार

पतीचे निधन झाल्याने कुटुंबाचा आधारच गेला.शिवणकाम करून मी घर चालवते. आर्थिक चणचण कायमच भासते.  परंतु ऑगस्ट महिन्यात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे तीन हजार रुपये बँक खात्यात आले. हे पैसे  मिळाल्याचा आनंद मी शब्दात सांगू शकत नाही,असे उदगार आहे धाराशिव जिल्ह्यातील तेर येथील 39 वर्षीय कविता युवराज आंधळे यांनी काढले.

कविता आंधळे म्हणतात,  माझ्यासारख्या गरीब परिस्थिती असलेल्या महिलांसाठी एक एक रुपयाही खूप मोलाचा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहिण  योजनेचे दरमहा 1500 रुपये मिळत असल्याने माझ्या कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे. ही योजना सुरू केल्याबद्दल लाडके भाऊ मुख्यमंत्री यांचे मनापासून आभार.

संसाराला हातभार

त्यांची मैत्रीण अलका चंद्रकांत नाईकवाडी या शेतकरी महिला लाभार्थी यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेमुळे संसाराला आर्थिक हातभार लागत असून योजना  अशीच पुढे चालू ठेवण्याची मागणी केली

आरोग्याची हेळसांड थांबली

शिराढोण येथील 63 वर्षाच्या रोशन बी इसाक शेख  म्हणतात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असल्याने या वयात होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांसाठी ही रक्कम खूप उपयोगी पडत आहे.पूर्वी  दवाखान्याच्या खर्चासाठी घरच्यांवर अवलंबून रहावे लागत होते. पण आत्ता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे घरच्यांवरही आर्थिक ताण येत नाहीय.या रक्कमेतून मी औषधांचा खर्च तर भागवतेच सोबत पौष्टिक फलाहार ही घेते. त्यामुळे  माझे आरोग्य चांगले राहण्यास मदत होत आहे.महिलांच्या आरोग्य देखभालीसाठी ही योजना महत्त्वपूर्ण असल्याचे श्रीमती शेख सांगतात.

शेतीच्या उत्पन्नाला हातभार

परंडा तालुक्यातील कंडारी गावच्या एका पायाने दिव्यांग असलेल्या 50  वर्षीय गंगाबाई संभाजी देशमुख म्हणतात,त्यांचे घर शेतीतून मिळणाऱ्या तटपुंज्या उत्पन्नावर अवलंबून आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीला कायमच तोंड द्यावे लागत असे.आत्ता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळत असल्याने  मुलाच्या शिकणाचा खर्च व  त्यांच्या दवाखान्याचा खर्च भागविण्यासाठी हातभार लागत आहे.ही योजना सुरू केल्याबद्दल  गंगाबाई शासनाचे आभारही मानतात.

यास्मीन म्हणते… योजना गजब की…

शिरढोण येथील 30 वर्षीय यास्मीन मोहसीन खतीब म्हणतात, त्यांचे कुटुंब शेती करून उदरनिर्वाह करते. शेतीतून मिळणारे उत्पन्न पुरेसे नाही. लाडकी बहिण योजना सुरू झाली आणि ऑगस्ट महिन्यात तीन हजार रुपयांचा लाभ भेटला. त्यामुळे त्यांना घरखर्च भागविणे सोईचे ठरले आहे. ही योजना सुरू केल्याबद्दल मुखमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार आणि ही योजना अशीच चालू ठेवावी ही विनंती.

योजना सुरूच ठेवा

त्याचबरोबर परंडा तालुक्यातील पाचपिंपळ गाव येथील अनिता खैरे, कळंब तालुक्यातील शिराढोण येथील वैशाली दत्ता मुळे, वैशाली गवळी इनगोदा (ता.परांडा)यांनीही मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळाल्याबद्दल शासनाचे आभार मानले.या योजनेतून  मिळालेल्या रक्कमेतून घरखर्च भागविणे सोपे झाले असून गरीब परिस्थिती असलेल्या महिलांसाठी लाडकी बहिण योजना चालू ठेवावी, अशी विनंती या लाभार्थी महिलांनी केली आहे.

शिक्षणासाठी हातभार ….

परंडा तालुक्यातील वाघेगव्हाणच्या अश्विनी कमलाकर कुलकर्णी म्हणतात,माझे कुटुंब शेतीवर अवलंबून आहे.घरखर्च, मुलांच्या शिक्षणासाठी खूप काटकसर करावी लागते.  मला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे भेटल्याचा खूप आनंद झाला. या मिळालेल्या पैशातून प्रथम मुलीच्या कॉलेजची फिस भरली. त्यामुळे मुलीचे पुढील शिक्षणासाठी चालू ठेवण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हातभार लागत आहे.

आम्ही भाग्यवंत : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला सन्मान

लाभार्थी महिलांनी व्यक्त केल्या भावना

धाराशिव, (परंडा) दि.14: मुख्यमंत्री सशक्तीकरण अभियान अंतर्गत शासनाच्या योजनेचा आम्हाला लाभ मिळाला आहे. सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते इतक्या मोठ्या समारंभात या लाभाचे सन्मानपत्रही मिळाले.  खरेच आमच्यासाठी हा अविस्मरणीय क्षण आहे, असे सांगत महिला सक्षम होण्यासाठी या योजना चालू राहिल्या पाहिजे अशा भावना प्रत्येक लाभार्थी महिलांनी  व्यक्त केल्या.

प्रसंग होता धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथील कोटला मैदानावर आयोजित महिला सशक्तिकरण अभियानाचे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य  व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत आयोजित  या कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओमंबासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्यासह मान्यवर आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, युवा कार्य प्रशिक्षण योजना तसेच विविध विभागा अंतर्गत लाभधारक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी जिल्ह्यातील विविध योजनांच्या लाभार्थी महिलांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी उषा पवार, जयश्री जाधव, अज्ञान कांबळे, वर्षा शेंडगे, लक्ष्मी टिळेकर, विठाबाई लोखंडे. कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टरचा लाभ मिळालेल्या राजश्री पाटील, रेशीम उद्योग विकास अंतर्गत तुती लागवडीसाठी चार लाख रुपयांचा लाभ मिळालेल्या छाया अंधारे, लखपती दीदी योजनेअंतर्गत शेती, दुग्ध व टेलरिंग व्यवसायासाठी अनुदानाचा लाभ मिळालेल्या पुष्पा सावंत तसेच महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत शेळीपालन व्यवसायासाठी अनुदानाचा लाभ मिळालेल्या रत्नमाला देशमुख या महिलांनी यावेळी शासनाचे आभार मानले.

*****

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here