वाडी-तांडे यांना शहरासोबत जोडणारे रस्ते दर्जेदार करावेत – क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे

उदगीर आणि जळकोट तालुक्यातील विविध रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन 

0
51

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून १८.५९ कोटी रूपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता 

लातूर, दि. 22 : गेल्या अनेक वर्षांपासून वाडी-तांड्यावरील नागरिकांना रस्त्याची सुविधा उपलब्ध नव्हती. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून उदगीर व जळकोट तालुक्यातील विविध वाड्या-तांड्यांना शहरासोबत जोडणारे रस्ते मंजूर करण्यात आले आहेत. या रस्त्यांची कामे दर्जेदार आणि जलदगतीने करण्याच्या सूचना क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी आज केल्या. उदगीर व जळकोट तालुक्यातील विविध रस्त्यांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.

उदगीर तालुक्यातील कार्यक्रमाप्रसंगी उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता आसिफ खैरदी, तहसीलदार राम बोरगावकर, गट विकास अधिकारी प्रवीण सुरडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तर जळकोट येथील कार्यक्रमाला नगराध्यक्ष प्रभावती कांबळे, उपनगराध्यक्ष मन्मथअप्पा किडे, तहसीलदार राजेंद्र लांडगे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती विठ्ठल चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामराव राठोड यांच्यासह संबंधित गावांचे सरपंच, उपसरपंच आणि नागरिक उपस्थित होते.

तांडे-वाड्यांवरील नागरीकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजनेतून निधी उपलब्ध करून दिला आहे. या तांड्यांवरील नागरिकांची गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यांची मागणी होती. त्यानुसार टप्पा-टप्प्याने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून कोट्यवधी रुपयांच्या रस्त्यांची कामे मंजूर केली आहेत. आज यापैकी काही रस्त्यांचे भूमिपूजन होत आहे. हे रस्ते पूर्ण झाल्यानंतर तांड्यावरील नागरिकांसह आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतीला रस्त्यांची सुविधा निर्माण होणार आहे. त्यामुळे शेतमालाच्या वाहतुकीला मदत होईल, असे ना. बनसोडे म्हणाले.

गेल्या पाच वर्षात उदगीर आणि जळकोट तालुक्यात करण्यात आलेल्या विकासकामांमुळे नागरिकांचा चांगल्या सुविधा उपलब्ध होत आहेत. तसेच राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांसाठी बळीराजा वीज सवलत योजना सुरू केली आहे. यासोबतच वयोवृद्ध नागरिकांना तीर्थ दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू केली आहे, असे ना. बनसोडे यांनी सांगितले.

या रस्त्यांचे झाले भूमिपूजन

उदगीर तालुका

राष्ट्रीय महामार्ग-63 ते बोरतळ तांडा-टिकाराम तांडा ते मारुती तांडा या अंदाजे 2.410 किमी रस्त्याच्या कामासाठी 2 कोटी 46 लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये रस्त्याचे डांबरीकरण, काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे.

जळकोट तालुका

राज्यमार्ग-248 ते धोंडवडी ते धर्मातांडा-रुपला तांडा दरम्यान 4.800 किमी रस्त्यासाठी 5 कोटी 47 लाख रुपये निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये रस्त्याचे डांबरीकरण, काँक्रीटीकरण, रुपला तांड्याजवळील नाल्यावर बॉक्स सेल पध्दतीचा पूल, 11 नळकांडी पूल आदी कामांचा समावेश आहे.

मरसांगवी ते चतरू तांडा- रावणकोळा दरम्यान 3.930 किमी रस्त्यासाठी 4 कोटी 22 लक्ष रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. रस्त्याचे डांबरीकरण व काँक्रीटीकरण, मरसांगवी गावालगत नाल्यावर बॉक्स सेल पद्धतीचा 15 मीटर लांबीचा पूल आणि एकूण 9 नळकांडी पुलांचे बांधकाम होणार आहे.

इतर जिल्हा मार्ग-54 ते जळकोट तांडा रस्ता कामासाठी 2 कोटी 37 लाख रुपये निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामधून 2.270 किमी रस्त्याचे बळकटीकरण होणार आहे. तसेच 2 नळकांडी पुलांचे बांधकाम होणार आहे.

इतर जिल्हा मार्ग- 54 ते जिल्हा सरहद्द – दापका राजा रस्त्याच्या कामासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून 2 कोटी 97 लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामधून 2.700 किमी लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण व काँक्रीटीकरण केले जाणार आहे. जळकोट गावाजवळील नाल्यावर नव्याने पूल बांधण्यात येणार आहे. यासोबतच 3 नळकांडी पूल उभारण्यात येणार आहेत.

राज्यमार्ग- 251 ते उमरगारेतू या 1.220 किमी लांबीच्या रस्त्याच्या बळकटीकरणासाठी 1 कोटी 8 लाख रुपये निधीच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामधून रस्त्याचे डांबरीकरण आणि सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. तसेच 1 नळकांडी पूल उभारण्यात येणार आहे.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here